कोल्हापूर
रविवारी (ता. २८) शहरात होणाऱ्या लिंगायत समाजाच्या महामोर्चासाठी पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत. अवजड वाहतूक पर्यायी मार्गांने वळवली आहे. दसरा चौकाकडे जाणारी सर्व वाहतूक बंद राहणार आहे. मोर्चासाठी येणाऱ्या वाहनांना पार्किंगची १३ ठिकाणी व्यवस्था केली आहे. मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.
शहरात रविवारी विविध मागण्यांसाठी लिंगायत समाजबांधवांचा महामोर्चा होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यांमधून मोठ्या संखेने लोक मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांनी शहरात प्रवेश करणाऱ्या नाक्यांच्या आसपास आणि शहरातील रिकाम्या जागांवर पार्किंगची व्यवस्था केली आहे. पार्किंगसाठी १३ ठिकाणे जाहीर केली आहेत. याशिवाय दसरा चौकाकडे जाणारी सर्व वाहतूक व्हीनस कॉर्नर, कोंडा ओळ, स्वयंभू गणेश मंदिर, सीपीआर चौक आणि जुन्या वाहतूक नियंत्रण कार्यालयापासून पर्यायी मार्गाने वळवली आहे. मोर्चासाठी पोलिस अधीक्षक, आठ वरिष्ठ अधिकारी, ८०० पोलिस, ५०० होमगार्ड आणि एसआरपीची एक तुकडी बंदोबस्तासाठी असेल. रविवारी सकाळपासून मोर्चाचा समारोप होईपर्यंत याची अंमलबजावणी होईल.
वाहतुकीतील बदल
दसरा चौक हे मोर्चासाठी मुख्य ठिकाण असल्याने रविवारी सकाळपासून दसरा चौकाकडे जाणाऱ्या सर्वच मार्गांवरील वाहतूक वळवण्यात येणार आहे. स्टेशन रोडवरील वाहतूक गोकुळ हॉटेलपासून पुढे गवत मंडई, पार्वती टॉकीज चौक मार्गे वळवली आहे. पंचगंगा पुलाकडून दसरा चौकाकडे येणारी वाहतूक सीपीआर चौकातून खानविलकर पंपाकडे वळवली आहे. व्हीनस कॉर्नर, स्वयंभू गणेश मंदिर, सीपीआर चौक आणि जुने ट्रॅफिक ऑफिसपासून वाहनांना दसरा चौकाकडे प्रवेश बंद करण्यात आला आहे. याशिवाय मोर्चा काळात शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे.
पार्किंगची व्यवस्था
लिंगायत महामोर्चावेळी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रवेश नाके आणि शहरातील रिकाम्या जागांवर पार्किंगची व्यवस्था केली आहे. ताडवे हॉटेलमार्गे येणाऱ्या वाहनांसाठी सासने ग्राऊंड आणि एस्तर पॅटर्न हायस्कूलच्या मैदनात व्यवस्था केली आहे. शिये, वडगाव, इस्लामपूर, शिराळा, आष्टा परिसरातील वाहनांसाठी एस्टर पॅटर्न, १०० फुटी रोड, कसबा बावडा पॅव्हेलियन, आर. व्ही. ग्राऊंड या ठिकाणी पार्किंग असेल. कागल, कर्नाटक परिसरातून येणाऱ्या वाहनांसाठी राजारामपुरीतील ९ नंबर शाळेचे मैदान, आयर्विन हायस्कूलचे मैदान, युको बँक परिसरात पार्किंगची व्यवस्था आहे. गारगोटी, भुदरगडकडून येणाऱ्या वाहनांसाठी शाहू दयानंद हायस्कूल, शिवाजी स्टेडियममध्ये पार्किंगची व्यवस्था आहे. गगनबावडा, सिंधुदुर्गकडून येणाऱ्या वाहनांसाठी पंचगंगा नदी घाटावर पार्किंग असेल.
पोलिस बंदोबस्त
पोलिस अधीक्षक - १
अपर पोलिस अधीक्षक - २
उपअधीक्षक - ६
निरीक्षक - २०
एपीआय, उपनिरीक्षक - ५०
पोलिस कॉन्स्टेबल - ८००
होमगार्ड - ५००
एसआरपी - १ तुकडी

Post a Comment