0
दक्षिण अाफ्रिका दौरा; ‘कहीं खुशी कहीं गम’; शिखर धवन तंदुरुस्त, जडेजा आजारी
केपटाऊन- उद्यापासून केपटाऊन येथे दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी एक चांगली आणि दुसरी वाईट बातमी मिळत आहे. चांगली बातमी म्हणजे संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज शिखर धवन पहिल्या कसोटीपूर्वी तंदुरुस्त झाला आहे. वाईट बातमी म्हणजे फिरकीपटू रवींद्र जडेजा व्हायरल इन्फेक्शनमुळे आजारी पडला आहे. अष्टपैलू जडेजा दोन दिवसांपासून व्हायरलमुळे त्रस्त झाला आहे. जडेजा बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली असून केपटाऊनची स्थानिक वैद्यकीय टीमदेखील संपर्कात आहे.

बीसीसीआयच्या डॉक्टरांनी स्थानिक वैद्यकीय प्रतिनिधीशी चर्चा करून उपचारासाठी जडेजाला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. तो पुढील ४८ तासांत पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. जडेजा पहिल्या कसोटीत खेळेल की नाही, याचा निर्णय शुक्रवारी सकाळी सामन्यापूर्वी घेतला जाईल. जडेजा उपलब्ध न झाल्यास टीम इंडियाकडे ३ वेगवान गोलंदाज, अष्टपैलू हार्दिक पांड्या, एकमेव फिरकीपटू रविचंद्रन अश्विन मैदानात उतरण्याचा पर्याय राहील. तीन गोलंदाजांत ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहंमद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह यांच्यात चुरस आहे. संघाचा सलामीवीर शिखर धवन घोट्याच्या दुखापतीतून सावरला आहे. तो पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध झाला आहे. आता धवन तंदुरुस्त झाल्याने तो सलामीला उतरणे निश्चत आहे. त्याच्या जोडीला मुरली विजय आणि लोकेश राहुल यांच्यातील एकाला संधी मिळेल. सामन्याच्या सकाळी भारतीय संघ जाहीर होईल.
स्टेनचे खेळणे संदिग्ध
पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. दक्षिण अाफ्रिकेचा स्टार वेगवान गोलंदाज डेल स्टेनचे पहिल्या कसोटीत खेळणे संदिग्ध झाले आहे. दक्षिण अाफ्रिकेचे प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांनी गोलंदाज डेल स्टेनला पुनरागमन करण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागले, असे संकेत दिले आहेत. शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीत त्याला खेळवणे जोखमीचे ठरेल. स्टेन सध्या तंदुरुस्त आहे, मात्र तो या आठवड्यात खेळेल की नाही हे सांगू शकत नाही, असेही गिब्सन यांनी म्हटले. दक्षिण अाफ्रिकेकडे रबाडा, फिलेंडर, मोर्ने मोर्केल, ख्रिस मॉरिस, अॅडिल फेलुकवायो हे स्टार गोलंदाज आहेत.

Post a Comment

 
Top