0
पुणे/मुंबई/अौरंगाबाद- भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ बुधवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला काही शहरांत हिंसक वळण लागले. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दुपारी ४ वाजता संप मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर राज्यात हळूहळू व्यवहार पूर्वपदावर अाले. तत्पूर्वी अनेक ठिकाणी दगडफेकीसह बसेस, वाहनांची तोडफोड व जाळपोळ झाली. एसटीसह खासगी वाहनांना ब्रेक लागले. दुकाने व शाळा बंदच होत्या. आंदोलनाच्या आडून हिंसा माजवणाऱ्यांविरोधात कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर राज्यभरात कारवाईला सुरुवात झाली. रास्ता रोको, रेल रोको, तोडफोड व जाळपोळ करणाऱ्यांविरोधात गुन्हे नोंदवून त्यांची धरपकड सुरू झाली. राज्यभरात ताेडफाेडीच्या १०२ गुन्ह्यांत १२७८ अांदाेलकांना ताब्यात घेतल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

प्रकाश अांबेडकर म्हणाले, हिंसक घटनांची जबाबदारी माझी नाही!
- अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘बंदमध्ये २५० संघटनांचा सहभाग होता. आजपर्यंत त्यांना मी शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. यापुढे शांततेची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. त्यांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई न केल्यास या संघटना पुन्हा उचल खातील व पुन्हा अशांतता निर्माण होईल. राज्यातील ५०% जनता बंदमध्ये सहभागी होती. राज्यात हिंसेच्या किरकोळ घटना घडल्या आहेत. दगडफेकीच्या घटना मंगळवारच्या आहेत. त्यांची जबाबदारी आपली नाही. जनतेने शांततेत आपला रोष दाखवल्याबद्दल आभार.

- भीमा कोरेगाव दगडफेक प्रकरणाच्या मुख्यमंत्र्यांच्या न्यायालयीन चौकशीचे आंबेडकर यांनी स्वागत केले. मात्र चौकशी करणारे न्यायाधीश दलित नसावेत, तसेच संबंधीत न्यायाधिशांना दिवाणी व फौजदारी अधिकार असावेत, अशी मागणी त्यांनी केली. कोम्बिंग आॅपरेशन राबवून आंबेडकरी कार्यकर्त्यांवर पोलिसांनी आकसाने कारवाई केल्यास ते भाजपला महागात पडेल, असा इशाराही आंबेडकर यांनी दिला.

कोरेगाव घटनेशी याकूबची मेमन प्रकरणाची तुलना : १९९३ बॉम्बस्फोटात याकूब प्रत्यक्ष सहभागी नव्हता. मात्र तो कटात सहभागी असल्याने तो प्रत्यक्ष सहभागी इतकाच दोषी असल्याचे मत सुप्रीम कोर्टाने नोंदवले होते. त्याप्रमाणे मुंबई पोलिसांनी करावाई केली व मेमनला शिक्षा झाली. तसाच प्रकार भीमा काेरेगाव दगडफेक घटनेत आहे. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकदा आघाडीचे मिलिंद एकबोटे दगडफेकीत प्रत्यक्ष सहभागी नसले तरी ते घटनेचे खरे सूत्रधार आहेत, त्यामुळे त्यांच्यावर प्रत्यक्ष सहभागीप्रमाणे कारवाई व्हावी, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.

महाराष्ट्र : २१३ एसटी डेपाे बंद, ३३ विमाने रद्द
- मुंबईत असंख्य वाहनांची ताेडफाेड, रेल-रास्ता राेकाेमुळे हाल, ३३ विमाने रद्द, ३७७ विमाने उशिराने उडाली. २५० पैकी २१३ एसटी डेपाे बंद.
- पुण्यात शांतता, काेरेगावात संमिश्र. कोल्हापुरात शिवसेनेचा प्रतिमोर्चा.
- अमरावतीत संतप्त व्यापाऱ्यांनी अांदाेलकांच्या गाड्या जाळल्या.

मराठवाडा : परभणीत संघाचे कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न
- परभणीत एसपी ऑफिसवर हल्ला. लातुरात दगडफेक, १५ पाेलिस जखमी
- बीड जिल्ह्यात भाजपच्या अामदार ठाेंबरे यांच्या कार्यालयावर दगडफेक {नांदेड, जालन्यात पाेलिसांवर हल्ला. हिंगाेलीत शाळा बंद न केल्याने शिक्षकाला मारहाण, उस्मानाबादेत बंदला मिळाला संमिश्र प्रतिसाद.

औरंगाबाद : परिस्थिती नियंत्रणात; दुपारी १ वाजेनंतर कोणतीही हिंसक घटना नाही
सकाळी ४ ठिकाणी दगडफेक झाली. दुपारी १ नंतर शहरात अनुचित घटना घडली नाही. चारनंतर बहुतांश भागातील दुकाने सुरू झाली. दौलताबादेत सहल बसवर दगडफेक झाली. एका मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

४४ जणांना अटक : बुधवारी धरपकड कारवाईत ४४ जणांना अटक, ४० वर लोकांना ताब्यात घेतले. मंगळवारी २०० वर लोक, तर बुधवारी १३ गुन्हे गुन्हे दाखल झाले. आतापर्यंत एकूण १०० वर जणांना अटक आणि ताब्यात घेण्यात आले आहे.

यामुळे शांतता : अफवांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी बुधवारी इंटरनेट बंद केले. तणाव असलेल्या भागात कॉर्नर बैठका घेत नागरिकांशी संवाद साधला. नियंत्रणाबाहेर परिस्थिती असलेल्या ठिकाणी धरपकडीचे सत्र सुरू केले. स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेतल्यामुळे बंद शांततेत पार पडला.

आज काय
- शहरात जमावबंदी कायम 
- दुपारपर्यंत माेबाइल इंटरनेट बंद
- सर्व शाळा, बससेवा अाणि बाजारपेठा सुरळीत सुरू होतील

नांदेड : लाठीमारात जखमी मुलाचा मृत्यू
हदगाव तालुक्यातील आष्टी येथे रास्ता रोको करणाऱ्या अांदाेलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात आष्टी येथील योगेश प्रल्हाद जाधव (१६) हा मुलगा डाेक्याला मार लागून जखमी झाला. रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

मुख्यमंत्री म्हणतात : ‘महाराष्ट्रात सध्या बाहेरचे लोक येतात व जातिवादाचे मुद्दे उकरून काढतात. विकासाचे मुद्दे नसलेले लाेकच अशा प्रकारे तणाव निर्माण करतात.’

संघाचा पलटवार : रा. स्व. संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य म्हणाले ,‘संघावर आराेप करणे ही काँग्रेसची जुनी खोड आहे. जातीच्या नावावर देश तोडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.’

संसद दणाणली
भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत उमटले. सरकार व विरोधकांत जुंपली. गाेंधळामुळे कामकाज तहकूब करावे लागले. काँग्रेसने सरकारच्या अपयशावर बाेट ठेवले, तर भाजपकडून काँग्रेसवर अाराेप करण्यात अाले.

दलित-मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा डाव
काही हिंदुत्ववादी संघटना व संघ दलित व मराठ्यांत फूट पाडतेय. भाजप सत्तेत असतो तेव्हा दलितांशी भेदभाव होतो. सुप्रीम काेर्टाच्या न्यायमूर्तींकडून या घटनेचा तपास करावा व पंतप्रधानांनी उत्तर द्यावे.
- मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस गटनेते

राज्यात विराेधकच घडवत अाहेत दंगल
महाराष्ट्राच्या विकासात अडथळा आणण्यासाठी विरोधकांनी दंगली पेटवल्यात. राज्यात भाजपचे सरकार अाल्यापासून तीन वर्षांत दंगल झाली नाही. विकास अजेंड्यावर उत्तर नसल्याने विरोधक दंगली पेटवत आहेत. 
- रावसाहेब दानवे, खासदार, भाजप
हिंसक वळणानंतर दुपारी 4 वाजता बंद मागे, राज्यात व्यवहार सुरळीत; 1278 आंदोलक ताब्यात
Add caption

Post a Comment

 
Top