0
धावती रिक्षा उलटून पेटली औरंगाबादच्या 3 चिमुरड्यांचा होरपळून मृत्यू, प्रवरा संगमजवळील घटना
औरंगाबाद-नातेवाइकाच्या साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून औरंगाबादकडे येणाऱ्या कुरेशी कुटुंबीयांच्या रिक्षाला नेवासा तालुक्यातील प्रवरा संगमजवळ सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अज्ञात वाहनाने हूल दिली अाणि ती उलटून पेटली. यात रिक्षातील तीन भावंडे होरपळली. या वेळी त्यांचे आजोबा सोबत होते. त्यांनी मुलांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, रिक्षाने वेगाने पेट घेतल्याने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. आजोबांसमोर त्यांच्या दोन नातींचा जागीच मृत्यू झाला, तर नातवाचे उपचारादरम्यान घाटीत निधन झाले. जुनेद शफिक कुरेशी (१३), नमीरा शफिक कुरेशी (८), महेविश अतिक कुरेशी (७) (सर्व रा. गल्ली नं. संजयनगर) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. घटनेत मुलांचे आजोबा रफिक हाजी जाफर कुरेशी (५५) यांचे दोन्ही हात भाजले. रिक्षाचालक समीर हनिफ कुरेशीला सुदैवाने दुखापत झाली नाही.

नेवासा पोलिस ठाण्यात शफिक कुरेशी (३५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नेवासा तालुक्यातील चांदा येथे सोमवारी संध्याकाळी नातेवाइकांचा साखरपुडा होता. त्यासाठी कुरेशी कुटुंबीय औरंगाबादहून तेथे गेले होते. रात्री कार्यक्रम संपल्यानंतर रिक्षाने (एमएच २० ईएस ०७२२) चालक समीरसह रफिक कुरेशी, नातू जुनेद, नात नमीरा महेविश हे रात्री ११ वाजेच्या सुमारास औरंगाबादला जाण्यासाठी निघाले. साडेबाराच्या सुमारास प्रवरा संगमजवळील पेट्रोलपंपासमोर रिक्षा उलटली अचानक पेटली. त्यातून चालक समीर आणि रफिक कसेबसे बाहेर पडले.

आग विझवण्याचे उपकरण कामी आले नाही
आजोबांनीतिन्ही मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तर समीरने समोरच्या पेट्रोलपंपावर धाव घेत ट्रकचालकांची मदत घेतली. पंपावर असलेल्या आग विझवण्याच्या उपकरणाचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते नेमके कसे चालू करतात हे माहीत नसल्यामुळे त्याचा उपयोग झाला नाही. मिनिटांत रिक्षा जळून खाक झाली. नेवासा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

वडील पोहोचेपर्यंत सर्वकाही संपले होते
मृतमुलांचे वडील शफिक कुरेशी कुटुंबातील इतर सदस्य रिक्षात जागा नसल्याने पाठीमागून दुसऱ्या गाडीने येत होते. साडेबाराच्या सुमारास गंगापूर फाट्याजवळ येताच रिक्षाने पेट घेतल्याचा फोन शफिक यांना आला. ते घटनास्थळी पोहोचेपर्यंत रिक्षा जळून खाक झाली होती. त्यात तिन्ही मुलांचा मृत्यू झाला. शफिक यांना अजून दोन अपत्ये असल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली.
धावत्या रिक्षाला आग लागण्याचे नेमके कारण काय याबाबत पोलिसांचा तपास सुरू अाहे. मात्र, प्रत्यक्षदर्शींशी चर्चा घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर दिव्य मराठीच्या तपासणीतून काही बाबी समोर आल्या. 
- रिक्षाला अज्ञात वाहनाने हूल दिल्याने ती उलटली. त्यामुळे रिक्षातील एलपीजीचा स्फोट झाला. 
- पेटलेली रिक्षा उलटल्यामुळे चिमुकल्यांना बाहेर पडता आले नाही. 
- रिक्षात खाण्याचे पदार्थ होते. सीट कुशनचे असल्याने काही मिनिटांतच रिक्षा जळून खाक झाली. 
- आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी आरटीओला पत्र दिले आहे.

रात्री १२:३० वाजता...
रात्री १२.३० वाजेच्या सुमारास रिक्षा उलटून तिला अाग लागली. त्यानंतर तीन मिनिटातच ती जळून खाक झाली. सकाळी रिक्षाचा असा सांगाडा शिल्लक होता.

गाढ झोपेत मृत्यूने गाठले
प्रवास आणि रात्रीची वेळ असल्यामुळे तिघांनाही गाढ झोप लागली असावी. त्यामुळे त्यांना रिक्षातून बाहेर पडता आले नाही, असे पाेलिसांचे म्हणणे अाहे.

तिघे अभ्यासात हुशार
नमीरा इयत्ता दुसरीत, महेविश पाचवीत, तर जुनेद सातवीत शिकत होता. तिघेही अभ्यासात हुशार होते, असे नातेवाईकांनी सांगितले.

नातवंडांना वाचवताना आजोबाही भाजले
नातवंडे आगीत होरपळताना पाहून रफिक यांनी त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यात त्यांचे दोन्ही हात भाजले. औरंगाबाद शहरात आल्यानंतर ते ओक्साबोक्शी रडत होते. त्यांचे दु:ख नातेवाइकांनाही पाहवत नव्हते. कुरेशी कुटुंबाचा मांसविक्रीचा व्यवसाय असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. या कुटुंबातील चारही भाऊ संजयनगर गल्ली क्रमांक पाचमध्ये एकत्र राहतात. घटनेची माहिती मिळताच शहरातील कुरेशी यांचे नातेवाईक, मित्र परिवाराने घाटीत धाव घेतली. तिन्ही चिमुकल्यांचे घाटीत शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दुपारी जिन्सी परिसरातील कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला.

Post a Comment

 
Top