0
बीडने नाव कमावले! एकाच वेळी 306 कन्यारत्नांचे नामकरण, स्त्री भ्रूणहत्येचा कलंक पुसला
बीड -स्त्री भ्रूणहत्येचा कलंक पुसून बीड जिल्ह्याने नाव कमावले आहे. ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत बीडमध्ये बुधवारी एकाच वेळी तब्बल ३०६ मुलींच्या नामकरणाचा सोहळा पार पडला. स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या १४ व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात राजयोग फाउंडेशन व कुटे ग्रुप फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला. विशेष म्हणजे ३०१ मुलींची नावनोंदणी झालेली असताना ऐनवेळी एकूण ३०६ मुलींचे नामकरण झाले. १५ ऑक्टोबर २०१७ ते १ जानेवारी २०१८ या कालावधीत या मुलींचा जन्म झालेला आहे.
३०६ मुलींच्या आत्यांनी केले कानात कुर्रर्रर्र!
सजवलेला भव्य मंडप, ३०१ पाळणे, बारशाची गीते अशा उत्साहात ३०१ मुलींच्या आत्यांनी कानात कुर्रर्रर्र करत बारसे केले. कीर्तन महोत्सवाचा समारोप अशा अनोख्या पद्धतीने झाला.
> १०१ मुलींचे सामूहिक नामकरण गतवर्षी सोहळ्यात केले होते
> ५०१ मुलींचेपुढील वर्षी नामकरण करण्याची घोषणाही झाली.
आईला साडीचोळी, लेकीला चांदीचे वाळे
मुलींना पाळणा, कपडे, खेळणी,चांदीचे वाळे भेट देण्यात आले. आईंना साडीचोळीचा आहेर व फेटा बांधून हळदी-कुंकू करत स्वागत झाले.
गौरवोद््गार; कुठेही असा सोहळा नाही : वंडर बुक
सोहळ्याची लंडनच्या ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्ड’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने नोंद घेतली. ‘मुलींचा असा सामूहिक नामकरण सोहळा जगात कुठेही झालेला नाही, असे कौतुक समन्वयकांनी केले.
शासन-सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांनी वाढला स्त्री जन्मदर
एकेकाळी बीड जिल्ह्यात १ हजार मुलांमागे ७०० मुली इतका जन्मदर खालावला होता. त्यातच स्त्री भ्रूणहत्या उघड झाल्या होत्या. तथापि, शासन व सामाजिक संस्थांच्या उपक्रमांमुळे स्त्री जन्मदरात सुधारणा झाली. आता जिल्ह्यात एक हजार मुलांमागे सध्या ९२७ इतका मुलींचा जन्मदर आहे. महाराष्ट्रात मुलींचा जन्मदर २०१५ च्या ९०७ च्या तुलनेत २०१६ मध्ये ८९९ पर्यंत घसरला होता.

Post a Comment

 
Top