0
जाधव यांच्या कुटुंबीयांशी भेटीच्या मुद्द्याचा वापर पाकने स्वतःच्या फायद्यासाठी केला - स्वराज
नवी दिल्ली - कुलभूषण जाधव प्रकरणी सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत भूमिका मांडली. ही भेट दोन्ही देशांच्या नात्यांसाठी मैलाचा दगड ठरली असती. पण पाकिस्तानने या भेटीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला असे सुषमा स्वराज म्हणाल्या.
काय म्हणाल्या सुषमा स्वराज..
> ही भेट दोन्ही देशांच्या नात्यांसाठी मैलाचा दगड ठरली असती. पण पाकिस्तानने या भेटीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला. 
माध्यमांना जाधव यांच्या आई आणि पत्नी यांच्या जवळ येऊ द्यायची परवानगी नसेल असे ठरले होते. पण पाकिस्तानी माध्यमांना जवळ येण्याची संधी देण्यात आली. 
> सुरक्षेच्या नावावर कपडे बदलायला लावण्यात आले. केवळ साडी परिधान करणाऱ्या जाधव यांच्या आईला सलवार कुर्ता परिधान करायला लावले. 
जाधव यांच्या पत्नीबरोबरच त्यांच्या आईचे मंगळसूत्र, बांगड्या आणि टिकली काढायला लावली. 
> बसताच कुलभूषण यांनी विचारले की बाबा कसे आहेत. कपाळावर टिकली आणि मंगळसूत्र नसल्याने कुलभूषण यांना काही बरे वाईट तर झाले नसेल अशी शंका आल्याने त्यांना विचारले. 
> मराठीत बोलण्याची संधी देण्यात आली नाही. शेजारी बसलेल्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सारखे त्यांना अडवले. त्या मराठीत बोलत राहिल्या तर त्यांचे इंटरकॉम बंद करण्यात आले. 
> सोबत गेलेल्या उप उच्चायुक्तांना मागच्या दाराने नेण्यात आले. त्यामुळे त्यांना कपडे, मंगळसूत्र, बांगड्या उतरवण्याच्या प्रकाराबाबत काहीही कळले नाही. अन्यथा त्यांनी विरोध केला असता. 
> जाधव यांच्या पत्नीचे बूट ठेवून घेतले आणि त्यात काहीतरी संशयास्पद असल्याचे सांगितले जात आहे. पण दिल्ली आणि दुबईच्या विमानतळावर त्या हेच बूट घालून गेल्या, तेव्हा सिक्युरिटी चेकमध्ये तसे काही का आढळले नाही. 
> जाधव काहीसे तणावात असल्याचे जाणवत होते असे त्यांच्या पत्नी आणि आईने सांगितले. त्यांना जेवढे सांगितले होते, तेवढेच ते बोलत होते, असे जाणवत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या प्रकृतीबद्दलही काळजी व्यक्त करण्यात आली.
राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनीही पाकिस्तानवर जोरदार टीका केली. पाकिस्तानला लोकशाहीवर विश्वास नाही. त्यांना शेजारी देशांबरोबर कसे वर्तन करावे हेही माहिती नाही. पण पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीबरोबर जे वर्तन केले ते कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबाबरोबरच घडले नाही, तर भारताच्या 120 कोटी जनतेच्या आई-बहीणींबरोबर हे घडल्याचे आम्ही मानतो.

सपा खासदारांच्या वक्तव्यावरून गदारोळ
- सपाचे राज्यसभेतील खासदार नरेश अग्रवाल यांनी बुधवारी जाधव यांच्यासंदर्भात एक लज्जास्पद वक्तव्य केले. ते म्हणाले, पाक जाधवला दहशतवादी समजतो, त्यामुळे त्याच्याशी तसेच वर्तन करत आहे. भारतानेही दहशतवाद्यांबरोबर तसेच वर्तन करायला हवे. या वक्तव्यावरून वाद वाढल्यानंतर त्यांनी आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढल्याचे म्हणाले. 
- व्यंकय्या नायडू म्हणाले, जाधव यांच्या आई आणि पत्नीबरोबर पाकचे वर्तन अमानवी होते. त्यामुळे भारताच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. भारताला शांती हवी आहे, पण काही देश वेगळाच मार्ग निवडत आहेत. 
- लोकसभेतील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, पाकने जाधव यांच्या आई आणि पत्नीबरोबर केलेल्या वर्तनाचा निषेध आहे. जाधव यांना लवकरात लवकर देशात आणायला हवे.

Post a Comment

 
Top