0
कर्जमाफीच्या मुद्द्यावरून तिसर्‍या दिवशीही घोषणाबाजी, विरोधक विधानभवनाच्या पायऱ्यांवर

नागपूर- संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीवरून विरोधकांनी तिसर्‍या दिवशीही विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, काल (मंगळवार) विरोधकांनी गोंधळ घातल्याने विधानसभेचे कामकाज अवघ्या तासाभरातच दिवसभरासाठी तहकूब झाले होते.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने करत संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी केली होती. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधी पक्षनेत्यांनी पुन्हा कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला. सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत असल्याचा आरोप करत विखे पाटील यांनी संपूर्ण कर्जमुक्ती आणि शेतकरी आत्महत्यांच्या विषयावर सविस्तर चर्चेची मागणी केली. या गोंधळात प्रश्नोत्तरे पुकारली गेली. मात्र, गोंधळ अधिकच वाढल्याने प्रश्नोत्तरांच्या तासातच कामकाज तीनदा तहकूब झाले. तास संपल्यावर गोंधळ कायम राहिल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले होते.

Post a Comment

 
Top