
मुंबई- मराठी मनावर अधिराज्य गाजविणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज पाचवा स्मृतिदिन. यानिमित्त आज आम्ही तुम्हाला बाळासाहेब ठाकरे या व्यक्तिमत्त्वाबाबत सांगणार आहोत. आज आम्ही सांगणार आहोत बाळासाहेब ठाकरे आणि विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांच्यातील किस्सा...
बाळासाहेब ठाकरे आणि विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांच्यात बऱ्याचवेळा एकत्र बैठका होत असत. धोटे हे आपला फॉरवर्ड ब्लॉक पक्ष सोडून काही काळ शिवसैनिक झाले होते. बाळासाहेबांना पाईपमध्ये तंबाखू पेरून धुराडे सोडण्याचा भारी शौक होता. तर, धोटे हे तंबाखू-सिगारेटचे प्रचंड विरोधी. धोटे यांना आपल्या बाजूला बसून कोणी सिगारेट ओढत आहे हे क्षणभरही सहन होत नाही. माझ्या बाजूला बसायचे असेल तर सिगारेट विझवा, अशी सूचना जांबुवंतराव हमखास करत, असे प्रसंग अनेकांना ज्ञात आहेत. जांबुवंतराव धोटे यांनी एकदा बाळासाहेबांना ‘सिगारेट विझवा’ असे स्पष्ट सांगितले आणि बाळासाहेबांनी लगेच सिगारेट विझविली. धोटे यांनी हा प्रसंग सांगितला होता.
1995 साली दारव्हा (जिल्हा - यवतमाळ) येथे निवडणूक कार्यक्रमात पत्रकारांनी या प्रसंगाच्या सत्यतेबाबत बाळासाहेब ठाकरे यांना विचारणा केली. तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते, धोटे यांनी अर्धसत्य सांगितले आहे. पूर्ण सत्य असे आहे की, धोटे यांना मी ही तुमची विनंती आहे की आदेश आहे? असा उलट प्रश्न विचारला होता. तेव्हा धोटे यांनी विनंती असल्याचे नम्रपणे सांगितले. धोटेंनी आदेश करून पाहावा, असेही आपण धोटे यांना म्हटले होते. पण धोटे समजूतदार असल्याने काही बोलले नाहीत. नंतर मी लगेच सिगारेट विझवली, असेही बाळासाहेब म्हणाले होते.
Post a Comment