0


मुंबई :- तीन वर्षांच्या बालिकेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोघा नराधमांना जेरबंद करण्यास तब्बल सहा महिने वेळ घेतल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना आज फटकारले. बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचा अपराध करूनही पोलीस आरोपींना पाठीशी घालत आहेत. हे प्रकरण गंभीर असूनही आरोपींना पकडण्यास उशीर का झाला असा सवाल करत मुंबई हायकोर्टाने पोलिसांना जाब विचारला, तसेच याप्रकरणी काय कारवाई केली त्याचा अहवाल सादर करा असे आदेश न्यायालयाने दिले.
तीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याची तत्काळ तक्रार दाखल करूनही तब्बल सहा महिन्यांनंतर पोलिसांनी दोन नराधमांना अटक केली. त्यापैकी मुख्य आरोपी हा शाळेचा ट्रस्टी असून यात एका शिक्षिकेचाही समावेश आहे. पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत हे प्रकरण स्वतंत्र तपासयंत्रणेकडे सोपवावे या मागणीसाठी पीडित मुलीच्या आईने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी आज न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. कोणतेही गांभीर्य न दाखवता पोलीस संबंधित प्रकरण हाताळत असल्यामुळे खंडपीठाने आश्चर्य व्यक्त करत तुम्हाला या प्रकरणाचे गांभीर्य कळते का असा सवाल पोलिसांना विचारला. आरोपींबाबत प्राथमिक माहिती असूनही पोलीस कारवाई करण्यास दिरंगाई करत असून ही दुर्दैवी बाब असल्याचे मतही खंडपीठाने यावेळी नोंदवले, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त व परिमंडळाच्या पोलीस उपायुक्तांना या प्रकरणाची दखल घेऊन याबाबत काय कारवाई केली त्याबद्दल अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

Post a Comment

 
Top