0
विराट कोहलीमुळे भारताचा विजय हुकला?

कोलकाता :  कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानात झालेली श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट ड्रॉ झाली आहे. या टेस्ट मॅचमध्ये विजयाच्या जवळ पोहोचलेल्या भारताला श्रीलंकेच्या शेवटच्या तीन विकेट घेता आल्या नाहीत. भारतानं ठेवलेल्या २३१ रन्सचा पाठलाग करताना श्रीलंकेनं शेवटच्या इनिंगमध्ये ७५/७ एवढा स्कोअर केला.

मॅचच्या शेवटच्या दिवशी कॅप्टन विराट कोहलीनं नाबाद शतक झळकावून श्रीलंकेपुढे २३१ रन्सचं आव्हान ठेवलं. पण विराटच्या याच शतकामुळे भारताला विजय मिळवता आला नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
विराट कोहलीनं ११९ बॉल्समध्ये नाबाद १०४ रन्स केल्या पण शतक बनवण्याच्या नादामध्ये भारतानं डाव उशीरा घोषीत केला. डाव घोषीत केल्यानंतर भारतीय बॉलर्सनी २६ ओव्हर्स बॉलिंग केली. या २६ ओव्हरमध्ये भारतानं श्रीलंकेच्या ७ बॅट्समनना तंबूत पाठवलं. पण विराट कोहलीनं शतकाच्या मागे न लागता डाव लवकर घोषीत केला असता तर भारतीय बॉलर्सना आणखी ओव्हर्स मिळाल्या असत्या आणि श्रीलंकेच्या सगळ्या विकेट घेण्यात यश आलं असतं.
या मॅचच्या प्रत्येक दिवशी अंधार लवकर पडल्यामुळे दिवसाचा खेळ लवकर संपवण्यात आला होता. त्यामुळे शेवटच्या दिवशीही खेळ लवकर संपवला जाणार हे माहिती असतानाही भारतानं डाव घोषीत करायला उशीर केला.
विराटचं रेकॉर्ड, सर्वात जलद बनवली ५० शतकं
कोहलीचं टेस्ट क्रिकेटमधलं हे १८वं शतक आहे. याचबरोबर कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० शतकं झाली आहेत. विराटनं वनडेमध्ये आत्तापर्यंत ३२ शतकं झळकावली आहेत. सर्वात जलद ५० शतकं झळकावण्याच्या रेकॉर्डची विराटनं बरोबरी केली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा हाशीम आमला आणि विराट कोहलीनं ३४८ इनिंगमध्ये ५० शतकं झळकावली आहेत. या यादीमध्ये सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० शतकं झळकावायला ३७६ इनिंग लागल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉटिंगनं ४१८ इनिंगमध्ये एवढी शतकं पूर्ण केली होती.

Post a Comment

 
Top