0


नागपूर- चंद्रपूरच्या तुकुम येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य मोरेश्वर महादेवराव वानखेडे (वय ५८) यांची शुक्रवारी पहाटे नागपुरात अजनी चौकाजवळ तलवारीचे घाव घालून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली होती. मात्र, त्यांच्या हत्येचा उलगडा नागपूर पोलिसांनी 24 तासांच्या आतच केला आहे. प्राचार्य वानखेडे यांची हत्या त्यांची पत्नी, मुलगी व तिचा बॉयफ्रेंड यांनी सुपारी देऊन घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वानखेडे हे गेली 9 वर्षे गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न या मोठ्या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते काम बघत होते.
पत्नी, मुलीने का दिली हत्येची सुपारी?
- पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राचार्य मोरेश्वर वानखेडे हे तापट स्वभावाचे होते. त्यामुळे मुलीला कडक शिस्तीत ठेवायचे.
- यावरून त्यांच्या घरात सतत भांडणे व्हायची. अखेर वानखेडेच्या वागण्याने त्रस्त होऊन त्यांची पत्नी व मुलीने त्यांच्या हत्येचा कट रचला.
- या हत्येसाठी वानखेडेच्या मुलीने तिचा बॉयफ्रेंड शुभमची मदत घेण्याचे ठरविले. शुभमने या दोघींना होकार दिला.
- त्यानुसार शुभमने नागपूर परिसरातील भाडोत्री गुंडामार्फत प्राचार्य वानखेडेंची हत्या करण्याचे ठरवले.
- चार लाख रूपयांत सौदा ठरला. त्यासाठीचे एक लाख रूपये गुंडाना अडवान्स म्हणूनही दिले.
- पत्नी, मुलगी व तिचा मित्र शुभम याने वानखेडे यांचा दिनक्रम सांगितले. त्यानुसार हे गुंड मागील चार दिवसापासून वानखेडे यांच्या पाठलगावर होते.
- शुक्रवारी पहाटे चंद्रपूरला कॉलेजला जाताना संबंधित भाडोत्री गुंडांनी वानखेडे यांची गळा चिरून हत्या केली.
अशी झाली प्राचार्याची हत्या-

- प्राचार्य वानखेडे हे रोज नागपूर-चंद्रपूर प्रवास करायचे. शुक्रवारी पहाटे ते चार वाजता त्यांच्या स्कुटीने अजनी रेल्वे स्थानकावर चंद्रपूरला जायला निघाले. तेथून ते रेल्वेने चंद्रपूरला जाणार होते. 
- मात्र, अजनी चौक ते कृपलानी चौक दरम्यान, अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून केला. 
- सकाळी त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांची स्कुटी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली होती. 
- अज्ञात मारेकऱ्यांनी ते स्कुटीवर असतानाच त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला होता. 
- नागपूरात राहणा-या व चंद्रपूरात नोकरीला असलेल्या या प्राचार्याची हत्या कशी झाली याचा पोलिसांनी सुरुवातीला अंदाज येत नव्हता.
- त्यासाठी नागपूर पोलिसांनी या खुनाच्या तपासासाठी पाच पथके तयार करून तपास केला. त्यापैकी एक पथक चंद्रपूरला रवाना करण्यात आले होते. 
- प्राचार्य वानखेडे यांचा चंद्रपूरला जाण्याचा नित्यक्रम होता. अजनी रेल्वे स्थानकावर स्कुटी ठेऊन ते रेल्वेने जायचे. 
- त्यामुळे त्यांची हत्या करण्यासाठी कोणीतरी पाळतीवर असावे आणि अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली असावी असा पोलिसांना संशय होता.
- वानखेडे यांच्या हत्येप्रकरणी नागपूरातील बजाजनगर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Post a Comment

 
Top