
मुंबई - उसाला तीन हजार 100 रुपये भाव मिळावा यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांवर गोळीबार झाल्याने राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य विरोधी पक्षांनी गोळीबाराचा निषेध करत नगरच्या पोलिस अधीक्षकांना निलंबित करण्याची मागणी केली.
नगर जिल्ह्यात शेवगावमध्ये आक्रमक शेतकऱ्यांवर पोलिसांनी आज गोळीबार केला. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली; तर शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्यांना शेतकरी गाडेल, असा संतप्त इशारा विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देत पोलिस अधीक्षकांना निलंबित करा, अशी मागणी केली.
तटकरे यांनी सांगितले की, हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. सरकारला जनतेच्या प्रश्नांचे गांभीर्यच कळत नाही. त्यामुळेच सहकारमंत्र्यांना नगरच्या घटनेचे गांभीर्य राहिलेले नाही.
विरोधी पक्षात असताना उसाला 3500 रुपये भाव मागणाऱ्यांनी आता सत्तेत आल्यानंतर 3100 रुपये भाव मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला, अशी खंत व्यक्त करत या सरकारला शेतकरी आगामी निवडणुकांत गाडून टाकेल, अशा इशारा मुंडे यांनी दिला.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. कर्जमाफीमध्ये फसवणूक केल्यानंतर आता सरकार शेतकऱ्यांना गोळ्या घालू लागले आहे.
Post a Comment