0


मुंबई : ‘नमस्कार! आकाशवाणीचे हे ‘वुई किड्स’ केंद्र आहे... लहान मुलांसाठी सुरू केलेल्या या केंद्रावर आपले स्वागत आहे,’ असे शब्द कानावर पडले, तर आश्चर्य वाटायला नको. मुंबईतील शंतनू जोशी या युवा आरजेच्या संकल्पनेतून हे रेडिओ केंद्र सुरू झाले असून, या रेडिओमुळे बाल-किशोरवयीन मुलांना स्वत:चा आवाज आणि हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे.
प्रत्येक शाळेत रेडिओ किंवा आवाज या विषयाची किमान एक तासिका असावी, असे शंतनूला वाटत होते. त्यातूनच ‘वुई किड्स’चा जन्म झाला. मुंबईतील सहा नामवंत शाळांमध्ये अशा तासिका सुरू करण्यात शंतनु आणि त्याच्यासोबतच्या हिमांशु साळुंखे, मृणाली ठाकूर, डॉ. नम्रता जोशी, माया बनकर या चमुला यश आले आहे. त्यामुळे या शाळांतील अगदी बालवाडी ते दहावीपर्यंतच्या बालकांकडून ‘व्ही किड्स’ची चमु रेडिओसाठीच्या सर्व कामांची तयारी करून घेते आणि त्यातील निवडक मुलांचे कार्यक्रम wekidsnetwork.com या रेडिओ पोर्टलवरून दररविवारी प्रसारित करण्यात येतात.
या माध्यमातून आतापर्यंत तब्बल ८ ते ९ हजार मुलांना प्रशिक्षण देऊन ‘वुई किड्स’च्या चमुने ‘आवाज के दुनिया के बादशहा’ बनविले आहे!
बाल रेडिओवरील गमतीशीर कार्यक्रम-
बातम्या, नाट्य, चित्रपट परीक्षण, मित्र- कुटुंबियांच्या मुलाखती, जाहिराती असे विविध कार्यक्रम प्रसारित करण्यात येतात. कार्यक्रमांची संहिता लिहिण्यापासून ते ध्वनिमुद्रीत आणि प्रसारित करण्यापर्यंत सर्वच गोष्टी चिमुरडेच करतात. त्यांना केवळ तांत्रिक साहाय्य देण्याचे काम शंतनुची चमु करते.
आता चिमुकल्यांचा थेट हितगुज करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. डॉ. नम्रता जोशी त्यांना वैद्यकीय, मानसशास्त्रीय साहाय्य करणार आहे. त्यामुळे ज्या विषयांवर पालकांशी मोकळेपणाने बोलता येत नाही, ते विषय मुलं इथे सांगू शकतील, असे शंतुन म्हणतो.

Post a Comment

 
Top