0
गुजरातमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात आघाडी होणार नाही.

मुंबई/ अहमदाबाद- गुजरात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्याची इच्छा होती. मात्र, काँग्रेसने राष्ट्रवादीला फारसे महत्त्व दिले नाही. परिणामी इच्छा असूनही आघाडी न झाल्याने अखेर स्वबळावर लढणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज सांगितले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी न झाल्याबाबत माहिती देताना प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून गुजरातमध्ये आम्ही निवडणुकीची तयारी करत होतो. भाजपचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावे या विचाराने आम्ही काँग्रेससोबत आघाडी करण्याच्या तयारीत होतो. याबाबत मागील काही दिवसांपासून बोलणीही सुरू होती. मात्र, काँग्रेसकडून आघाडीसंदर्भात ठोस पावले उचलायला व निर्णयाला विलंब होत गेला. आम्ही ज्या काही मोजक्या जागांवर लढण्याचा विचार करत होतो. त्या जागेवरही काँग्रेसने उमेदवार जाहीर केले. त्यामुळे आता आघाडी होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आल्याचे मानत आम्ही उमेदवार उभे करणार असून, काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतला होता.
राज्यसभा निवडणुकीतील दगाबाजीमुळे काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीला झिडकारले?
काँग्रेसने गुजरात निवडणुकीत सर्वत्र बेरजेचे राजकारण केले आहे. शरद यादव यांच्या गटाने व लालूप्रसाद यादव यांच्यासह अखिलेश सिंह बिनशर्त पाठिंबा काँग्रेसला दिला आहे. मात्र, काँग्रेसने राष्ट्रवादीबाबत पहिल्यापासून दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबले. याचे मागे चार महिन्यापूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत झालेला दगाफटका हे कारण मानले जाते. गुजरातमध्ये राष्ट्रवादीचे दोन आमदार होते. मात्र, राज्यसभा निवडणुकीवेळी ऐन वेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपला मतदान केल्याचा ठपका काँग्रेसने ठेवला. अहमद पटेल राज्यसभेत 44 मतांसह विजयी झाले होते. विजय होण्याच्या आधीच त्यांनी मला काँग्रेसच्या 43 आमदारांची तर शरद यादव गटाच्या एका जेडीयू आमदाराचे मत पडल्याचे सांगितले होते. राष्ट्रवादी आमदारांनी मला मतदान केले नाही हेच त्यांना यातून सूचित करायचे होते. दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी प्रफुल्ल पटेल यांच्या सांगण्यावरूनच भाजपला मतदान करायला भाग पाडल्याचे बोलले गेले.
प्रफुल्ल पटेल हे यूपीए सरकारमध्ये नागरी हवाई उड्डाणमंत्री होते. याकाळात विमाने खरेदी करताना काही हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे बोलले गेले. याबाबत कॅगनेही ठपका ठेवला होता. यावर सध्या विविध यंत्रणा तपास करत आहेत. त्यामुळे आपण गोत्यात येऊ शकतो याची धास्ती प्रफुल्ल पटेलांना असल्याने त्यांनी मोदी-शहा यांच्याशी जुळवून घेत गुजरात राज्यसभा निवडणुकीत पक्षाच्या दोन आमदारांना भाजपला मतदान करण्याबाबत भूमिका घेतली होती. खुद्द शरद पवारांनी मात्र काँग्रेसला मतदान करावे असा पक्षादेश (व्हीप) काढला होता. तरीही पटेल यांनी भाजपलाच मतदान करायला आमदारांना भाग पाडले होते. या सर्व घडामोडीमुळे काँग्रेस पक्ष नाराज होता. त्यामुळे आता काँग्रेसला पूरक वातावरण असताना अचानकपणे राष्ट्रवादीला काँग्रेस पक्षासोबत युती करावी असे वाटत होते.
भाजपला अनुकूल असलेल्या पटेलांकडे गुजरातची सूत्रे-
राष्ट्रवादीला खरोखरच काँग्रेससोबत आघाडी करायची होती का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कारण भाजपला अनुकूल असलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्याकडेच गुजरात निवडणुकीची सूत्रे पवारांनी सोपवली होती. ज्या पटेलांनी राज्यसभा निवडणुकीत अहमद पटेलांच्या विरोधात मतदान करायला लावले तेच अहमद पटेल तेथे काँग्रेसची सर्व सूत्रे हालवत आहेत. या स्थितीत प्रफुल्ल पटेल कोणत्या तोंडाने त्यांच्यासमोर जाणार होते हा सवाल होताच. राष्ट्रवादीने त्याऐवजी तारिक अन्वर व सुप्रिया सुळे यांच्याकडे काँग्रेससोबत बोलण्याची जबाबदारी पवारांनी दिली असती तर काँग्रेसने किमान त्यांच्यासोबत चर्चा तरी केली असते असे सांगितले जात आहे. मात्र, प्रफुल्ल पटेलच समोर आल्याने काँग्रेसने त्यांना झुलवत ठेवले व अनुल्लेखाने मारत आपले उमेदवार जाहीर केले. यामुळे राष्ट्रवादीचा हिरमोड झाला व आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असे पटेल यांना जाहीर करावे लागले. अर्थात शरद पवारांना याचे फार सोयरसुतक नसल्याचे सांगितले जाते.

Post a Comment

 
Top