0


दाभोळ - भाजप-शिवसेना सरकारच्या अनागोंदी कारभाराचा निषेध करण्यासाठी दापोली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १३ नोव्हेंबरला दापोलीत आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार संजय कदम यांनी दिली.
हा मोर्चा दापोली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सकाळी ११ वाजता सुरू होऊन तहसीलदार कार्यालयात निवेदन दिल्यावर समाप्त होईल. 
सध्या सरकार सर्व सुविधा ऑनलाईन देण्याच्या मागे आहे; मात्र ऑनलाईन करण्यासाठी शासनाने बेसिक इन्फ्रास्ट्रक्‍चर उभे केलेले नाही. त्यामुळे त्याचा सर्वांत जास्त त्रास हा लाभार्थीना होत आहे.
विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डाची सक्‍ती करण्यात आली आहे. मात्र नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्डमधील माहितीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी शासनाने आधार सेवा केंद्रेच सुरू केलेली नाहीत. पूर्वी होती तीसुद्धा बंद झाली आहेत. आधार कार्ड काढायचे, तर त्यासाठी नागरिकांना दापोलीबाहेर जावे लागते. या सर्व प्रकाराला जनता कंटाळली आहे. जनतेतील या विषयीची खदखद या मोर्चावाटे बाहेर पडेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष
दापोली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना राज्य शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. वाढीव वीज बिले, शेतकरी कर्जमाफीत अनागोंदी अशा विविध समस्या नागरिकांना सतावत आहेत. जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांना मिळणारा वित्त आयोगातील विकासनिधी बंद करण्यात आला असून या पदावर काम करणारे पदाधिकारी आता केवळ शोभेचे बाहुले राहिले आहेत, असा दावा संजय कदम यांनी केला.

Post a Comment

 
Top