0
अ ते ज्ञ मुळाक्षरांचा वापर करून मराठी गझलचा प्रयोग


मुंबई - गझलचा मूळ इतिहास हजार वर्षांचा असेल तर मराठी गझलचा इतिहास हा अवघ्या नव्वद वर्षांचा आहे. मराठी गझल अजून बाल्यावस्थेत असून तिच्या विकासासाठी नवनवीन प्रयोग होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने स्वर, व्यंजन आदींनी मिळून ते ज्ञपर्यंत जेवढी मुळाक्षरे आहेत, त्या सर्वांचा यमकामध्ये (काफिया रदिफ) वापर करून मराठी गझल लिहिण्याचा पहिलावहिला प्रयोग मराठी साहित्यात प्रथमच ज्येष्ठ गझलकार ए. के. शेख यांनी “अमृताची पालखी’ या गझल संग्रहातील सर्वच्या सर्व म्हणजे सव्वादोनशे गझलांमध्ये केला आहे. या गझलसंग्रहाचे वाशी येथे ११ १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या नवव्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनात प्रकाशन होणार आहे.
‘अमृताची पालखी’ या शेख यांचा गझल संग्रह गझल सागर प्रतिष्ठानच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासंदर्भात गझल सागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रख्यात गझल गायक भीमराव पांचाळे म्हणाले, स्वर, व्यंजन आदींनी मिळून अ ते ज्ञ पर्यंत जेवढी मुळाक्षरे आहेत, त्या सर्वांचा यमकामध्ये (काफिया रदिफ) वापर करून गझल लिहिण्याचे प्रयत्न उर्दूमध्येही खूप कमी झाले आहेत. त्यामुळे या प्रकारचा मराठी गझलेमध्ये जो प्रयोग होत आहे, त्याचे रसिक जाणकारांनी स्वागतच करायला हवे.
ए. के. शेख यांच्या “अमृताची पालखी’ या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील प्रत्येक गझल कोणत्या छंदात, वृत्तात आहे त्याची माहिती त्या गझलेबरोबर दिलेली आहे. गझलेच्या पहिल्या शेरात तिचा आकृतिबंध स्पष्ट झाल्यानंतर, तिची ‘जमीन’ निश्चित झाल्यावर मग यमक उर्फ काफिया आपल्या वैशिष्ट्यांसह शेवटपर्यंत तोच कायम राहतो. काफियाचे शब्द बदलतात, पण त्याच्या अंमलबजावणीचा कायदा गझलेच्या शेवटापर्यंत तोच कायम राहतो. याचे अचूक भान या गझल लिहिताना ए. के. शेख यांनी बाळगले आहे. “अमृताची पालखी’ हा गझल संग्रह त्याच्या अनेक वैशिष्ट्यांमुळे आगळा ठरणार असल्याने त्याचे प्रकाशन नवव्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनात करण्याचे गझल सागर प्रतिष्ठानने ठरविले. ए. के. शेख हे सोलापूर येथे झालेल्या आठव्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाचे अध्यक्ष होते.
"मनाचा मौन दरवाजा’ संग्रहाचेही प्रकाशन
ए. के. शेख यांच्या गझल संग्रहाबरोबरच अमरावती जिल्ह्यातील प्रफुल्ल भुजाडे या मराठी गझलकाराचा “मनाचा मौन दरवाजा’ हा गझल संग्रहही या संमेलनात गझल सागर प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित करण्यात येईल. त्यामध्ये विविध प्रकारच्या गझला भुजाडे यांनी लिहिल्या आहेत.

Post a Comment

 
Top