0


मुंबई- काँग्रेसची साथ साेडून स्वाभिमानी महाराष्ट्र पक्ष काढणारे व ‘एनडीए’त सामील हाेऊन मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे स्वत:च्याच राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेची पाेटनिवडणूक लढविणार अाहेत. सात डिसेंबर राेजी या निवडणुकीसाठी मतदान हाेणार अाहे. मात्र राणे यांचा विधान परिषदेतील प्रवेश रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी अाणि शिवसेनेने जाेरदार फिल्डींग लावण्यास सुरुवात केली अाहे.
राणेंविराेधात काँग्रेसचा एकमेव उमेदवार देऊन राष्ट्रवादी व शिवसेना त्याला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. दुसरीकडे, भाजप व अपक्षांच्या मदतीने अापलाच विजय निश्चित असल्याचा दावा राणेंकडून केला जात अाहे.

विधानसभा निवडणुकीत दाेनदा पराभूत झाल्यानंतरही काँग्रेसने राणेंची विधान परिषदेत वर्णी लावली हाेत. मात्र या पक्षातून अन्याय हाेत असल्याचे सांगत राणेंनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला साेडचिठ्ठी देत स्वत:चा पक्ष काढला. काँग्रेसकडून मिळालेल्या विधान परिषद सदस्यत्वाचाही त्यांनी राजीनामा दिला हाेता. याच रिक्त जागेसाठी सात डिसेंबरला मतदान घेण्याचे निवडणूक अायाेगाने जाहीर केले अाहे. त्यामुळे राणे व काँग्रेस, राष्ट्रवादीच्या गाेटात हालचालींना वेग अाला अाहे. एनडीएत सामावून घेताना भाजपने राणेंना मंत्रिपदाचे अाश्वासन दिले अाहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे तसे सांगितले अाहे. त्यामुळे राणेंच्या नव्या पक्षाचा एकही अामदार नसताना त्यांना विधान परिषदेत निवडून अाणण्याची सर्वस्वी जबाबदारी भाजपवर असणार अाहे. दुसरीकडे, राणेंंना विधान परिषदेत जाण्यापासून राेखण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीचे प्रयत्न असतील. त्याला राणेंचे कट्टर विराेधक शिवसेनेचीही साथ मिळणार अाहे.
पक्षीय बलाबल
विधानसभेत भाजपचे १२२, शिवसेनेचे ६३, काँग्रेसचे ४२, राष्ट्रवादीचे ४१ आणि इतर पक्षाचे २० आमदार आहेत. निवडणुक जिंकण्यासाठी १४५ मतांची आवश्यकता आहे. भाजप आणि अपक्षांच्या मदतीने राणे विजयी होऊ शकतात. काँग्रेस, राष्ट्रवादीतील काही हितचिंतक अामदारांची मदत मिळाल्यास राणेंचा विजय साेपा हाेऊ शकताे. दुसरीकडे, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर त्यांची संख्या १४६ होते. मात्र राणेंचे पूत्र नितेश आणि समर्थक कोळंबकर हे राणेंनाच मत देतील यात शंका नाही.
शिवसेना-काँग्रेसपुढे उभा राहील पेच
नारायण राणे नकोत म्हणून शिवसेनेने काँग्रेसला मदत केली तर त्याचा फटका गुजरातमधील निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना दोघांनाही बसण्याची शक्यता आहे. गुजरात निवडणुका ९ आणि ११ तारखेला आहेत तर परिषदेची पोटनिवडणुक ७ तारखेला आहे. शिवसेनेने तटस्थ राहायचे ठरवले तरी आणि काँग्रेसला मदत केली तरी नारायण राणे जिंकून येऊ शकतात. त्यामुळे नक्की काय करायचे असा प्रश्न शिवसेना नेतृत्वापुढे पडला आहे.

Post a Comment

 
Top