
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे ‘वर्षा’ बंगल्यावर जातील. या भेटीत राज ठाकरे मुख्यमंत्र्यांशी फेरीवाल्यांच्या प्रश्नावर चर्चा करतील.
28 ऑक्टोबरला मुंबईतील मालाडमध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे आणि इतर कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांनी जीवघेणा हल्ला केला. यात सुशांत माळवदे हे जबर जखमी झाले. आधीपासूनच फेरीवाल्यांविरोधात सुरु असलेल्या मनसेच्या आंदोलनाने यानंतर मात्र आक्रमक रुप धारण केले.
एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसेने फेरीवाल्यांविरोधातील आपलं आंदोलन आणखी तीव्र केले. मुंबई असो वा नवी मुंबई किंवा ठाणे, या प्रमुख शहरांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेने आपल्या स्टाईलने आंदोलनं केली. यामध्ये अनेक ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पावलंही उचलली. एकंदरीतच फेरीवाला आंदोलनाने गेल्या काही दिवसात मोठं रुप धारण केलं आहे.
मनसेच्या आंदोलनानंतर मुंबईतील अनेक रस्त्यांनी, रेल्वे स्थानकांबाहेरील जागांनी मोकळा श्वास घेतला. त्यामुळे मनसेच्या आंदोलनांना पाठिंबाही वाढत गेला. त्यात काल (1 नोव्हेंबर) काँग्रेसने फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता. पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेऊन मोर्चा रोखला. मात्र त्याचवेळी मनसेचे कार्यकर्तेही काँग्रेस कार्यकर्त्यांना भिडले आणि मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
एकंदरीत गेल्या काही दिवसात फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेलाही मोठा जनाधार मिळू लागला आहे.
आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आज फेरीवाल्यांचा प्रश्न मांडणार आहेत. या भेटीत नक्की काय होतं आणि या भेटीनंतर राज ठाकरे मनसेची काय भूमिका जाहीर करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Post a Comment