
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत महापौरपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयवंत सुतार यांनी बाजी मारली आहे. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार सोमनाथ वास्कर यांचा पराभव केला. तर, उपमहापौरपदी कॉंग्रेसच्या मंदाकिनी म्हात्रे यांची निवड झाली आहे.
जयवंत सुतार यांना एकूण 67 मते मिळाली, तर सोमनाथ वास्कर यांना 38 मते मिळाली. या निवडणुकीवेळी भाजपाच्या सहा नगरसेवकांनी हजेरी लावली नाही. तर, अपक्षांसह काँग्रेसची मते राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मंदाकिनी म्हात्रे यांना 64 मते मिळाली, तर शिवसेनेचे उमेदवार द्वारकानाथ भोईर यांना 38 मते मिळाली. तसेच, कॉंग्रेसच्या बंडखोर उमेदवार वैजयंती भगत यांना फक्त तीन मते पडली.
प्रत्यक्ष मतदानादिवशी मते फुटू नयेत यासाठी सर्वपक्षीयांनी नगरसेवकांना व्हिप जारी करण्यात आले होते. राष्ट्रवादीकडून महापौरपद हिसकावून घेण्यासाठी शिवसेनेने अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले होते. परंतु ऐनवेळी भाजपाने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने विजय चौगुले यांनी माघार घेतली व निवडणुकीमधील चुरस जवळपास संपुष्टात आली. मात्र, काँग्रेसमध्ये उपमहापौर पदावरून मतभेद सुरु होते.
नवी मुंबई महानगरपालिकेचे 13 वे महापौर म्हणून जयवंत सुतार विराजमान होणार आहेत. तसेच, त्यांच्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गणेश नाईक यांचे विश्वासू सहकारी म्हणून पाहिले जाते. त्यांनी 1995 पासून चारवेळा नगरसेवक म्हणून महापालिकेवर निवडणून गेले आहेत. याचबरोबर, सभागृह नेते, स्थायी समिती सभापतीपद भूषविले आहे.
मंदाकिनी म्हात्रे या 2014 मध्ये प्रथमच महापालिकेवर नगरसेविका म्हणून निवडून आल्या. माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांच्या त्या पत्नी आहेत. रमाकांत म्हात्रे यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाते.
Post a Comment