0
The last over of Ashish Nehra’s career

नवी दिल्ली : फलंदाजानं चौकार मारो अथवा षटकार… आशिष नेहराच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य कायम असायचं. विकेट घेतल्यानंतरही त्याचं ते हसू टीव्ही स्क्रिनवर कायम पाहायला मिळायचं. किंबहुना कारकीर्दीतील शेवटचा चेंडू टाकेपर्यंत त्याच्या चेहऱ्यावरील ते हास्य कायम होतं. पण शेवटच्या चेंडूनंतर नेहरा मैदानावरच काहीसा भावूक झालेला दिसून आला.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियानं  53 धावांनी विजय मिळवत नेहराला शानदार निरोप दिला. या सामन्यात भारतीय खेळाडूंचं वर्चस्व पाहायला मिळालं. भारतानं न्यूझीलंडसमोर 203 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण न्यूझीलंड 20 षटकात फक्त 149 धावाच करु शकला आणि भारतानं सहज विजय मिळवला.
या सामन्यातील शेवटचं षटकही नेहरानंच टाकलं. चार षटकात त्यानं 29 धावा दिल्या. आपल्या आजवरच्या कारकीर्दीवर आपण खूश असल्याचंही यावेळी नेहरा म्हणाला.

नेहराची शेवटची ओव्हर!  

आजवरच्या अनेक अटीतटीच्या सामन्यात नेहरानं शेवटचं षटक टाकलं. पण आजच्या सामन्यातील शेवटचं षटक टाकण्याआधी नेहराही भावूक झाला होता. आपल्या कारकीर्दीतील शेवटची ओव्हर असणार याची जाणीव असूनही नेहरा यावेळी देखील प्रत्येक चेंडूनंतर मनमोकळंपणानं हसत होता.

पहिला चेंडू : न्यूझीलंडचा फलंदाज सौदी स्ट्राइकवर होता. नेहरानं पहिलाच चेंडू शॉर्ट पीच टाकला. त्याला तो मारता आला नाही. या चेंडूवर एकही धाव निघाली नाही.
दुसरा चेंडू : हा चेंडू देखील नेहरानं शार्ट पीच टाकला. यावरही सौदी धावा काढू शकला नाही.
तिसरा चेंडू : या चेंडूवर सौदीनं नेहराला एक चौकार ठोकला.
चौथा चेंडू : हा चेंडू नेहरानं वाईड टाकला.
चौथा चेंडू : चौथा चेंडू नेहरानं बाऊन्सर टाकला. पण यावर सौदीनं लेग-बाइज 1 धाव घेतली.
पाचवा चेंडू : पाचव्या चेंडूवर सॅन्टनरनं एक धाव घेतली.
सहावा चेंडू : नेहरानं आपल्या कारकीर्दीतील शेवटचा चेंडू निर्धाव टाकला आणि इथेच त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रवास थांबला!

तब्बल 18 वर्ष भारतीय संघात खेळणाऱ्या आशिष नेहरानं आज आपल्या घरच्या मैदानावरुन आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.

Post a Comment

 
Top