0
सचिन यांना ‘पुलोत्सव जीवनगौरव सन्मान’; प्रियंका बर्वे तरुणाई सन्मानाचे मानकरी

पुणे- आशय सांस्कृतिक आयोजित पुलोत्सवात ‘पुलोत्सव जीवनगौरव सन्मान’ ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते सचिन पिळगावकर यांना जाहीर झाला आहे. तसेच युवा पिढीचे प्रतिनिधी अमेय वाघ आणि प्रियंका बर्वे हे पुलोत्सव तरुणाई सन्मानाचे मानकरी ठरले आहेत.

जीवनगौरव पुरस्कार वितरण १२ नोव्हेंबरला, तर तरुणाई सन्मानप्रदान कार्यक्रम ११ नोव्हेंबरला पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी सहा वाजता होणार आहे, अशी माहिती आयोजक वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार यांनी दिली. या वर्षी ९ ते १२ नोव्हेंबरदरम्यान पुण्यात पुलोत्सव साजरा होणार आहे. महोत्सवात दोन विशेष परिसंवाद होणार असून, त्यामध्ये मान्यवर वक्ते सहभागी होणार आहेत.

‘चार संपादक’ या परिसंवादात दिलीप पाडगावकर, गोविंद तळवलकर, अरुण साधू आणि ह. मो. मराठे या चार दिवंगत साक्षेपी संपादकांच्या योगदानाच्या अनुषंगाने रविमुकुल, राजीव खांडेकर, आनंद आगाशे आणि दिनकर गांगल हे विचारमंथन मांडणार आहेत. दुसरा परिसंवाद ‘भाषाप्रभू पु. ल.’ असा असून, त्यात मुकुंद टाकसाळे, डॉ. मंदार परांजपे, प्रा. मिलिंद जोशी आणि चंद्रकांत काळे तसेच मंगला गोडबोले यांचा सहभाग आहे, असे चित्राव म्हणाले. पुलोत्सव सर्व रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे.

Post a Comment

 
Top