0


ठाणे - मुंबई-नाशिक महामार्गावर हायड्रोजन गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकरला अपघात झाल्याने महामार्गावर गॅस गळती सुरू झाली होती. त्यामुळे या महामार्गावरील वाहनचालकांत भितीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर शहापूर पोलिसांनी गळती होणारा वायू ज्वलनशिल नसल्याची खात्री करुन महामार्गावरील वाहतूक सुरू केली आहे. आज पहाटे शहापूर जवळील कांबारे येथे ट्रक आणि टँकरची धडक झाल्याने हा अपघात झाला.
अपघातग्रस्त टँकर हा अलिबागहून मुरबाडच्या टेक्नोक्राफ्ट कारखान्यात हायड्रोजन वायू घेऊन निघाला होता. त्यावेळी हा टँकर मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर येथील एका जवळील वळणावर वळण घेत असताना नाशिकहून मुंबईच्या दिशेने लसून घेऊन जाणाऱ्या ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला. त्यामुळे दोन्ही वाहने पलटी झाली. त्यावेळी टँकरमधून हायड्रोजन गॅसची गळती सुरु झाली. 

या अपघातामुळे टँकरमधून गॅस गळती सुरु झाल्याने महामार्गावरील वाहनचालक व प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूतक कोंडी निर्माण झाली. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेतली व गळती होणारा गॅस धोकादायक आहे का याची खात्री केली. त्यानंतर तो ज्वलनशिल अथवा विषारी वायू नसल्याची खात्री होताच. महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली आहे. 

अपघातामध्ये टँकर चालक जगदीश शंकर केळकर (४२) व हैदर अली (४०) असे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Post a Comment

 
Top