0


नवी दिल्ली- महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोवा हे देशातील सर्वात सुरक्षित राज्य आहे, तर देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील राज्ये महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित आहेत. ‘प्लान इंडिया’द्वारे तयार करण्यात आलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.
महिला सुरक्षेच्या बाबतीत महाराष्ट्राची कामगिरी यथातथाच आहे. देशभरातील राज्यांचा विचार केल्यास महाराष्ट्र या यादीत नवव्या स्थानावर आहे. देशातील राज्यांच्या कामगिरीची सरासरी काढल्यास महाराष्ट्राची कामगिरी किंचित चांगली आहे.
महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोवा सर्वाधिक सुरक्षित असून बिहार सर्वाधिक असुरक्षित आहे. बिहारसोबतच झारखंड, उत्तरप्रदेश आणि दिल्लीदेखील महिलांसाठी असुरक्षित असल्याचे आकडेवारी सांगते, तर गोव्याखालोखाल केरळ, मिझोरम, सिक्कीम, मणीपूर या राज्यांचा क्रमांक लागतो. प्लान इंडियाकडून तयार करण्यात आलेला अहवाल महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालात महिला सुरक्षेसह शिक्षण, आरोग्य, गरिबी हे मुद्दे विचारात घेण्यात आले आहे.
महिला सुरक्षेच्या बाबतीत देशातील राज्यांना शून्य ते एक असे गुण देण्यात आले. यामध्ये गोव्याला ०.६५६ गुण मिळाले आहेत. तर बिहारला सर्वात कमी म्हणजे ०.४१० गुण मिळाले आहेत. देशभरातील राज्यांच्या कामगिरीची सरासरी काढल्यास ती ०.५३१ इतकी होते.
त्या तुलनेत महाराष्ट्राची (०.५८०) कामगिरी चांगली आहे. महिला सुरक्षेच्या बाबतीत महाराष्ट्र नवव्या क्रमांकावर आहे. या बाबतीत महाराष्ट्राचा शेजारी असलेला गुजरात १६ व्या स्थानी आहे.
महिला सुरक्षेसह इतरही अनेक क्षेत्रांमध्ये गोव्याची कामगिरी चांगली झाली आहे. गोवा शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत पाचव्या, तर गरिबीच्या बाबतीत आठव्या स्थानी आहे.
केरळमधील आरोग्य व्यवस्था सर्वात चांगली आहे. त्यामुळे आरोग्य सुविधेच्या बाबतीत केरळ ०.६३४ गुणांसह देशात अव्वल आहे. महिला सुरक्षेसोबतच आरोग्य सुविधांच्या बाबतही बिहारची कामगिरी खराब असल्याचे आकडेवारी सांगते. आरोग्य सुविधांच्या बाबतीत बिहार ०.४१० गुणांसह तळाला आहे. याशिवाय गरिबीतही बिहारची स्थिती अत्यंत वाईट आहे.

Post a Comment

 
Top