0


मुंबई :- रस्ते व अर्धा फूटपाथ फेरीवाल्यांनी व्यापलेला, तर अर्धा दुकानदारांना आंदण दिलेला... दादर पश्चिमेचा रेल्वे स्थानकाबाहेरील भाग म्हणजे फेरीवाल्यांची हक्काची जागा. पादचाऱ्यांनाही चालायला जागा नसलेल्या या परिसरात बेस्ट बस येईल, असे अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत सांगितले असते, तर कुणाचाही विश्वास बसला नसता. मात्र रेल्वे, पालिकेच्या फेरीवाल्यांवरील कारवाईनंतर मंगळवारपासून बेस्टच्या दोन बस चक्क केशवसूत पुलापर्यंत येऊ लागल्या आहेत.

दादर फेरीवालामुक्त करण्यात आल्याची संधी साधून बेस्टने दादर ते वरळी आणि दादर ते नेहरू तारांगण असे दोन नवे बसमार्ग सुरू केले आहेत. दादर पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरील कामत हॉटेलजवळून या बस सुटत असल्याने प्रवाशांची सोय झाली असून, शेअर टॅक्सीची मक्तेदारी मोडता आली आहे. दादर पश्चिम येथून बस क्रमांक ५६ वरळी आगारासाठी, तर बस क्रमांक १५१ नेहरू तारांगणसाठी सोडण्यात येत आहे. ५६ क्रमांकाची पहिली बस सकाळी ६.२०, तर शेवटची बस ९.३० वाजता सोडण्यात येते. १५१ क्रमाकांची पहिली बस नेहरू तारांगणसाठी सकाळी ८ वाजता सुटेल, तर दुपारी १२ वाजता शेवटची बस असेल. दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी पुन्हा पहिली, तर ६.४० वाजता शेवटची बस असणार आहे. या बसना प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्यास आणखी बस सोडण्यात येणार असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top