0
पुणे: उरळी कांचन येथील भीषण आगीत होलसेल साडी डेपोसह फर्निचर दुकान खाक

पुणे- सोलापूर रस्त्यावरील उरळी कांचन येथे आज (शुक्रवार) पहाटे लागलेल्या भीषण आगीत एक कापडाचे आणि त्याच्या शेजारील दोन फर्निचरची दुकाने जळून खाक झाली. शेजारीच लाकडी वखार असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली. अग्निशामक दलाच्या जवानांच्या प्रयत्नांनी सध्या आगीवर नियंत्रण मिळवले असून कुलिंगचे काम सुरू आहे.
सोलापूर रस्त्यावरील उरळी कांचन येथे लाकडाच्या वखारीला मोठ्या प्रमाणात आग लागून भीषण अग्नितांडव पाहावयास मिळाले. स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाला पहाटे चार वाजता याबाबत माहिती दिली. त्यांनी तातडीची कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न केले. 3 गाड्यांच्या सहाय्याने जवळपास 3 तास हे आग विझवण्याचे काम सुरू आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले असून सध्या काम सुरू आहे.
अधिकारी सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे रस्त्यावर लाकडाची मोठी वखार आहे. त्याच्या शेजारी कापडाचे आणि फर्निचरची दोन दुकाने आहेत. या अग्नितांडवात कापडाचे दुकान जळून खाक झाले तर शेजारील दोन्ही फर्निचरची दुकानेही जळाली आहेत. मात्र नेमकी सुरुवातीला आग कशाला लागली हे सांगणे अवघड आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र कापडाचे दुकान ज्या पद्धतीने जळाले त्यानुसार आग सुरुवातीला कापडाच्या दुकानाला लागली असावी, असा अंदाज आहे. तसेच स्थानिक नागरिकांच्या सांगण्यानुसार रात्री दीडच्या सुमारास कापडाच्या दुकानातून थोडा फार धूर निघत होता. मात्र, त्यावेळी याबाबत अग्निशामक दलाला कळवण्यात आले नव्हते. नंतर आग मोठ्या प्रमाणात भडकून कापडाचे संपूर्ण दुकान जळून खाक झाले. शेजारीच लाकडी वखार व फर्निचर असल्याने आगीने पेट घेऊन रौद्र रूप धारण केले. त्यानंतर पहाटे चार वाजता याबाबत अग्निशामक दलाला कळविण्यात आले.
माहिती मिळताच जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. सध्या कुलिंगचे काम सुरू आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्राथमिक माहिती -
- पहाटे 4 वाजता अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात आगीची वर्दी
- अग्निशमन दलाकडून हडपसरची एक फायरगाडी व मुख्यालयातून दोन वॉटर ब्राऊझर टँकर रवाना ; स्थानिक वॉटर टँकरची मदत
- घटनास्थळी 2 सिलिंडरचे स्फोट तर 3 सिलिंडर जवानांनी बाहेर काढले
- 12 ते 15 गुंठ्यामधे साडीचे गोडाऊन व जुन्या सागवानी लाकडाचे मोठे गोडाऊन जळाले
- आग साडीच्या दुकानात प्रथम लागली स्थानिकांची माहिती
- गोडाऊनमधे कामगार वास्तव्यास होते सुदैवाने जखमी वा जिवितहानी नाही
- सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात
- अद्याप आग पुर्ण विझली नाही ; कुलिंगचे काम सुरु
- पुणे अग्निशमन दलाचे अंदाजे 12/15 जवान व स्थानिकांकडून आगीवर नियंत्रण
- अजूनही दुपारपर्यंत अग्निशमन दलाकडून कुलिंगचे काम राहणार सुरु

Post a Comment

 
Top