
जळगाव-भुसावळ,औरंगाबादकडून येणाऱ्या वाहनांसाठी शहराचे प्रवेशद्वार असलेल्या अजिंठा चाैफुलीवर दररोज सायंकाळी ट्रॅव्हल्सचालकांची मनमानी सुरू असते. बुधवारी सायंकाळी ६.४५ वाजता एक ट्रॅव्हल्स चालकाने बस महामार्गावरून वळवून शहराच्या दिशेने घेतली. समोर मोकळा रस्ता नसल्यामुळे ट्रॅव्हल्स अडकली, त्यामुळे सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. ट्रक,एसटी बस,चारचाकी वाहनांची गर्दी, कर्णकर्कश हॉर्न, वाहनांच्या रांगांमधून वाट काढण्यासाठी दुचाकीधारक,रिक्षाचालकांची धडपड यामुळे चौक परिसर आणि महामार्गावर दोन तास प्रचंड गोंगाट ,गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
अजिंठा चौफुलीवर दोन दिवसांपूर्वी देखील वाहतुकीची कोंडी झाली होती. बुधवारी भुसावळ मार्गाकडून येणाऱ्या एका ट्रॅव्हल्स चालकाने नेरीनाका परिसरात चाैफुली भाेवती शहराकडे वळण घेतले. समोर उभ्या असलेल्या दुचाकी, रिक्षा, चारचाकींमुळे त्याला रस्ता मिळाला नाही. ही ट्रॅव्हल्स अर्धी महामार्गावर तर अर्धी शहराच्या दिशने उभी राहिली. त्यामुळे चारही बाजूंची वाहतूक खोळंबली होती. यातच औरंगाबादकडून भुसावळकडे जाण्यासाठी वळण घेणाऱ्या कंटेनरची भर पडली. ट्रॅव्हल्स कंटेनर ही दोन्ही वाहने जास्त लांब असल्यामुळे त्यांना वळण घेण्यासाठी जास्त जागा मिळाली नाही. परिणामी वाहतुकीची कोंडी होण्यास सुरुवात झाली. पाहता-पाहता काही मिनिटांतच महामार्गावर दोन्ही बाजूंना दोन-दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. एमआयडीसीकडून येणाऱ्या रिक्षा, दुचाकींनी मिळेल तेथून वाहने काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे कोंडीत आणखीच भर पडली. वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सतीश जोशी, छगन पाटील, शिवाजी माळी, सुनील फेगडे यांच्यासह जिल्हा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. दोन तासांनंतर वाहतूक सुरळीत झाली होती.
अतिक्रमण हटाव केवळ गाजावाजा
अजिंठाचौकातील अतिक्रमण काढून तेथे सुशोभिकरण करण्याचा गाजावाजा महापालिका जिल्हा प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी केला. त्यानंतर मात्र, या चौकाकडे लक्ष दिले गेले नाही. अतिक्रमण काढल्यानंतर मोकळ्या झालेल्या जागेवर पुन्हा हॉकर्स, रिक्षाचालक उभे असतात. ती जागा पुन्हा एकदा अतिक्रमणाने वेढली आहे. सायंकाळी वाहनांची वर्दळ वाढल्यानंतर वाहतुकीची कोंडी होते.
सामान्य नागरिकांनी केली मदत
वाहतुकीचीकोंडी झाल्याचे दिसून आल्यानंतर शरीफ पठाण, सरवर खान या दोन नागरिकांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मदत केली. पठाण हे ठाणे शहरातील रहिवासी आहेत. काही कामानिमित्त जळगावात आले असता, त्यांना वाहतुकीची कोंडी खटकली. म्हणून त्यांनी मदत केली. या शिवाय दररोज कोणी ना कोणी नागरिक पोलिसांच्या मदतीला धावून येतो. या चौकातील रस्ते अरुंद असल्यामुळे ही समस्या आठवड्यातून किमान दोन वेळा तरी सहन करावी लागते आहे.
कोंडीतून मार्ग काढताना अपघात
वाहतुकीची कोंडी झालेली असताना देखील एका ट्रक समोरून मार्ग काढण्याचा प्रयत्न करताना दुचाकीस्वाराचा अपघात झाला. ट्रकचा धक्का लागल्यामुळे त्याच्या दुचाकीचे (एमएच १० यु ०३३०) नुकसान झाले आहे.
Post a Comment