
औरंगाबाद-अल्पवयीन मुले आणि तरुणांना नशेच्या आहारी नेणारे ड्रग्ज रॅकेट शहरात बिनधास्तपणे सुरू असल्याचा पर्दाफाश ‘दिव्य मराठी’ने केल्यानंतर सिटी चौक पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखेने दोन दिवसांत जुन्या शहरात चालणाऱ्या या रॅकेटविरुद्ध कारवाई सुरू केली असून मंजूरपुरा आणि लोटाकारंजा भागातून दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २६ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. काळ्या बाजारात त्याची किंमत एका लाखापेक्षा जास्त असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आवेज खान मेहबूब खान (२५, रा. मंजूरपुरा), शेख कलीम ऊर्फ छोटू पिता शेख कादर (२४, रा. लोटाकारंजा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या दोघांकडून नायट्रोव्हेट १० च्या ७२ स्ट्रिप, नायट्रोसन १० च्या ९९ स्ट्रिप आणि रेस्क कफ सिरप १०० एमएमलच्या ३० बाटल्या जप्त करण्यात आल्या. नशेच्या बाजारात या गोळ्यांना बटण म्हणतात. मेडिकल स्टोअरमध्ये या गोळीची किंमत आठ रुपयांपर्यंत असली तरी ती प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळत नाही. नशेच्या बाजारात एका गोळीची किंमत ५० रुपयांपर्यंत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या गोळ्या विशिष्ट पद्धतीने घेतल्या की गांजा किंवा दारू, हेरॉइनसारखी नशा येते. याप्रकरणी कलम ३२८ सह औषध आणि सौंदर्यप्रसाधन कायदा कलम १८ (सी) १८ (ए) १८ (बी) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे, सिटी चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत कदम, उपनिरीक्षक नागरे, अन्न औषध प्रशासन विभागाचे राजगोपाल बजाज, निरीक्षक माधव निमसे, हवालदार दिलीप मोदी, मोहंमद अझहर, पोलिस नाईक नंद, शेख गफ्फार, सचिन शिंदे, खेडकर, तायडे, शिपाई प्रधान, रोकडे यांच्या पथकाने केली.
सामान्यघ रातील मुले ग्राहक
या टोळीकडून नशेचे पदार्थ विकत घेणारी मुले सामान्य घरातील आहेत. अटक केलेले दोघेही सामान्य घरातील आहेत. आवेजचे वडील हे टेलर काम करतात. शहरातील वर्दळ नसलेल्या भागात अशा प्रकारचे अड्डे सुरू असल्याचे समोर आले आहे. या जागांवर पाळत ठेवून त्या ठिकाणी पेट्रोलिंग वाढवणे, जमेल तेवढ्या भागात सीसीटीव्ही लावणे यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त यशस्वी यादव म्हणाले.
दिल्लीकर्नाटकहून येत होता मालन शाखोरीचे हे साहित्य दिल्ली आणि कर्नाटक येथून येत आहे. आवेज शहरातील काही मेडिकल दुकानांचे लेटरहेड वापरून कंपन्यांकडून हा माल मागवत असे, तर शेख कलीम आलेला माल हा जुन्या शहरातील छोट्या विक्रेत्यांकडे पोहोचवत असे. मंजूरपुरा, चंपा चौक, कटकट गेट, रोशन गेट, संजयनगर, जुना मोंढा, जाफर गेट, बाराभाई ताजिया आणि सिटी चौक परिसरात हा माल विकला जात होता. शहरातील काही मेडिकल दुकानदार डॉक्टरांशी या रॅकेटचे संबंध असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्या दिशेने तपास सुरू असल्याचे शिवाजी कांबळे यांनी सांगितले.
Post a Comment