
उत्तर सोलापूर- पारंपरिक शेतीतील जोखीम वाढल्याने तालुक्यातील काही शेतकरी वनशेतीकडे वळत अाहेत. त्यांच्याकडून ‘मिलिया डुबया’ सरख्या बहुउपयोगी वृक्षाची लागवड केली जात आहे. यातून भविष्यात चांगल्या उत्पन्नाची अशा या शेतकऱ्यांना आहे. हीच लागवड गट शेतीच्या माध्यमातून झाल्यास आणखी लाभ होण्याची संधी आहे.
दुष्काळामुळे तालुक्यातील द्राक्ष बागा लुप्त झाल्या, तर शासनाच्या धोरणामुळे भुसार पिकातून उत्पन्न हाती लागेना म्हणून जिज्ञासू शेतकरी नवनवीन पिकांचा शोध घेऊ लागले आहेत. बीबीदारफळ येथील शेतकरी अशोक मोरे यांनी मिलिया डुबिया’ या वृक्षाची लागवड केली आहे. ‘मिलिया डुबिया’ वृक्षाच्या लाकडाला बाजारात मोठी मागणी अाहे. त्याचा वापर मुख्यत: काडीपेटी उद्योग कमी वजनाचे फर्निचर तयार करण्यासाठी केला जातो. कमी कालावधीत हा वृक्ष वाढतो. याची पाण्याची गरज अत्यल्प आहे. सरळ वाढणाऱ्या या वृक्षाचा बुंधा गोलाकार उंच होतो. सध्या मोरे यांनी अडीच एकर क्षेत्रावर लागवड केली अाहे. त्यांची झाडे सव्वावर्षाची झाली आहेत . सध्या त्यांची उंची ३० फूट इतकी झाली अाहे. बुंध्याचा घेर एक फूट इतका झाला आहे. पाच वर्षांनी झाडापासून उत्पन्न घेता येते. सात लाख रुपये इतके उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
मोरे यांची लागवड पाहून गावातील इतर पाच शेतकऱ्यांनीही मिलिया डुबियाची लागवड केली आहे. सध्या बीबीदारफळ गावात पस्तीस एकर क्षेत्रावर याची लागवड झाली आहे.
भविष्यात आणखी काही शेतकरी लागवडीच्या तयारीत अाहेत. शासन स्तरावर या लागवडीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अशा वन लागवडीतून भविष्यात शेतकऱ्यांना ‘कार्बन क्रिडेट’ सारख्या बाबीतून फायदा मिळू शकतो .
लाकडाची वाढतचाललेली मागणी शेतीतील पारंपरिक पिकाच्या बाबतीत उत्पन्नातील अनिश्चितेमुळे वृक्ष लागवडीकडे वळलो आहे, इतर वृक्षापेक्षा मिलिया डुबिया हा वृक्ष जलद गतीने वाढतो.
- अशोक मोरे, शेतकरी बीबी दारफळ, ता. उत्तर सोलापूर
मिलिया डुबिया वृक्ष लागवडीचे नियोजन
माहितीघेण्यासाठी तामिळनाडू येथे प्रत्यक्ष भेट. काडीपेटी उद्योगात मागणी. पाच वर्षांच्या झाडाची किमत सहा हजार रुपया पर्यंत. पंधरा रुपयांप्रमाणे रोपे खरेदी. सध्या रोपांचे दर कमी झाले आहेत. पहिल्या वर्षी कांद्याचे अंतर पीक. उन्हाळी हंगामात सावलीतील ढोबळी मिरची. वरखताची फारशी गरज नाही.
Post a Comment