0


अनिकेत कोथळे हत्येप्रकरणी सांगली शहर पोलिसातील आणखी ७ जणांना निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची संख्या आता १२ इतकी झाली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह ५ जणांना न्यायालयाने यापूर्वीच पोलीस कोठडी सुनावली आहे. निलंबित ७ पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये ठाणे अमंलदार, रात्रपाळीचे चार गार्ड्स, वायरलेस ऑपरेटर आणि त्यांच्या मदतनिसाचा समावेश आहे. पोलीस ठाण्यात कोथळेच्या मृत्यूप्रकरणी दुर्लक्ष केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपी अनिकेत कोथळेचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याची घटना सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात घडली होती. या प्रकरणात अनिकेत पोलीस कोठडीतून पळाल्याचा बनाव पोलिसांनी रचला होता. मात्र सखोल चौकशीनंतर अनिकेतचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अनिकेतचा मृतदेह आंबा घाटात नेऊन जाळल्याची धक्कादायक बाबही उघड झाली.
कोल्हापूर रस्त्यावर एका अभियंत्यास चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी अनिकेत (वय २६) आणि अमोल भंडारी (वय २३) या तरुणांना अटक केली होती. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या बाजूला डिटेक्शन ब्रँचचे ऑफिस असून सोमवारी रात्री दोन्ही आरोपींना चौकशीसाठी डिटेक्शन ब्रँचच्या कार्यालयात नेले जात होते. या दरम्यान दोन्ही आरोपींनी पळ काढल्याचे पोलिसांनी म्हटले होते. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामठे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद देत गुन्हादेखील नोंदवला होता. यातील अमोल हा निपाणीत सापडला होता तरी अनिकेतचा थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याप्रकरणाची दखल घेतली असून पोलिसांनी थर्ड डिग्री वापरल्यामुळे आरोपीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी राज्याचे महासंचालक सतीश माथूर यांना आयोगाने नोटीस बजावली आहे.

Post a Comment

 
Top