
पावसाच्या व्यत्ययानंतर सुरू असलेल्या भारत आणि श्रीलंके दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव १७२ धावांत आटोपला. चेतेश्वर पुजाराचे (५२) अर्धशतक वगळता भारताचा एकही फलंदाज श्रीलंकन गोलंदाजीसमोर टिकाव धरू शकला नाही.
वृध्दिमान साहा (२९), रविंद्र जडेजा (२२) तर शेवटी मोहम्मद शमीने (२४) काही काळ धावफलक हलता ठेवला. लंकेकडून सुराना लकमलने सर्वाधिक ४ बळी घेतले. त्याला लाहिरू गामागे, दासुन शणाका, दिलरूवान परेरा यांनी प्रत्येकी दोन बळी घेत चांगली साथ दिली.
पहिल्या कसोटीत सलग दुसर्या दिवशी पावसाचा खेळ झाल्यानंतर आजच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात पावसाची उघडीप मिळाली. मैदानावर खेळ सुरू झाला असला तरी भारतीय प्रेक्षकांसाठी फारशी समाधानकारक बाब ठरली नाही. श्रीलंकेच्या भेदक मार्यासमोर दुसऱ्या दिवशी टिकाव धरलेला चेतेश्वर पुजारा कालच्या नाबाद ४७ धावांच्या खेळीत अवघ्या पाच धावांची भर टाकून तंबूत परतला. गमागेने त्रिफळा उडवून त्याला माघारी पाठविले.
पुजारा तंबूत परतल्यानंतर वृद्धिमान साहा आणि रवींद्र जडेजा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनाही फारसे यश आले नाही. जडेजा २२, तर साहा २९ धावांवर बाद झाला. दोघांनाही परेरानेच तंबूचा रस्ता दाखविला. पावसामुळे अनिश्चिततेचे सावट असलेल्या कसोटीत भारताची सलामी जोडी साफ अपयशी ठरली, तर मधल्या फळीनेही निराशा केला. शनिवारी सकाळी आठ बाद १३६ अशी संघाची अवस्था असताना त्यात ५२ धावा एकट्या पुजाराच्या होत्या.
ईडन गार्डनवर पहिल्या दिवशी सुरंगा लाकमलने टीम इंडियाची दाणादाण उडवल्यानंतर दुसऱ्या दिवशी दासून शानाकाने अजिंक्य रहाणे आणि आर. अश्विन यांना तंबूची वाट दाखवली होती. भरवशाच्या चेतेश्वर पुजाराने थोडी फार झुंज देण्याचा प्रयत्न केला होता.
Post a Comment