0
गायिका सुहासिनी कोरटकर यांचे निधन, गानगुरू आणि विचारवंत हरपल्या
पुणे - भेंडीबाजार घराण्याच्या ज्येष्ठ गायिका, गानगुरू, बंदिशकार आणि विचारवंत डॉ. सुहासिनी कोरटकर (७३) यांचे कर्करोगाने पुण्यात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या अविवाहित होत्या. त्यांच्या पश्चात त्यांचा शिष्यपरिवार आहे. डॉ. कोरटकर यांचा जन्म कलाप्रेमी सुधारक विचारांच्या कुटुंबात ३० नोव्हेंबर १९४४ मध्ये झाला.
लहानपणापासून त्यांच्यावर संगीताचे संस्कार झाले. कोवळ्या वयापासून त्या ज्येष्ठ गानगुरू पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्याकडे भेंडीबाजार घराण्याचे मार्गदर्शन घेऊ लागल्या. घराण्याची गायकी आत्मसात केल्यावर सुहासिनीताईंना अचानक प्रकृतीच्या विविध तक्रारींनी घेरले. त्यांना सातत्याने कफ, सर्दी, ताप, थंडीचा त्रास सुरू झाला. त्यांची फुप्फुसे कमजोर असल्याने पूर्ण दमसांसाचे घराणेदार गायन त्यांना झेपणार नाही, असे मत काही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले. पण गुरूंच्या मार्गदर्शनावर आणि स्वत:च्या साधनेवर विश्वास ठेवत ओंकारसाधना, प्राणायामाने सुहासिनीताईंनी प्रकृतीवर मात केली.

प्रकाशनाआधीच एक्झिट
डॉ.सुहासिनी कोरटकर यांनी आयुष्यभर ज्या गोष्टीचा ध्यास घेतला होता, ते भेंडीबाजार घराण्याचा इतिहास, शैली, कलावंत आणि संगीतविश्वाला घराण्याने दिलेले योगदान असा बृहत्प्रकल्प प्रकाशनाच्या वाटेवर असतानाच डॉ. कोरटकर यांचे निधन झाल्याने संगीतप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. २३ नोव्हेंबरला या ग्रंथाचे प्रकाशन होणार होते, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तियांनी दिली.

Post a Comment

 
Top