श्रीनगर : दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी सोमवारी मध्यरात्री जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात जोरदार सर्च ऑपरेशन केलं. आज सकाळपर्यंत हे सर्च ऑपरेशन सुरू होतं. यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं. या कारवाई नंतरही सुरक्षा दलाने कुपवाडामध्ये सर्च ऑपरेशन सुरूच ठेवलं असून आणखी अतिरेकी लपून बसले आहेत काय? याचा शोध घेत आहेत.
कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडामधील मागम परिसरात दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाल्यावर सुरक्षा दलाच्या जवानांनी या परिसराला घेरले. सुरक्षा दलाने या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करताच दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यामुळे जवानांनीही त्यांना प्रत्युत्तर म्हणून गोळीबार सुरू केला. त्यात पाकिस्तानमधील तीन दहशतवादी मारले गेले.
'मागम परिसरात दहशतवादी लपल्याची खबर मिळताच अर्ध्या रात्रीपासून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. सीआरपीएफ, पोलीस आणि लष्कराच्या जवानांनी ही कारवाई केली. दहशतवाद्यांना घेरल्यानंतर त्यांना आधी आत्मसमर्पण करण्याचं आवाहन करण्यात आलं. मात्र त्यांनी गोळीबार सुरूच ठेवला. त्यामुळे जवानांनी केलेल्या कारवाईत तीन अतिरेकी मारल्या गेले,' असं काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी सांगितलं.
Post a Comment