0


गोरेगाव येथील आरे कॉलनीतील कारशेडसह मेट्रो रेल्वेच्या मार्गातील आणखी ४४४ झाडांची कत्तल करण्यास परवानगी मिळावी यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास शिवसेनेकडून कडाडून विरोध करण्यात आला. या वृक्षांची पाहणी करण्याची मागणी करीत शिवसेना सदस्यांनी हा प्रस्ताव रोखून धरला. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये कलगी तुरा रंगण्याची चिन्हे आहेत.
आरे कॉलनीमध्ये मेट्रो रेल्वेची कारशेड उभारण्यात येणार आहे. मेट्रो प्रकल्पाशी संबंधित प्रस्ताव सुधार समितीमध्ये सादर करण्यात आले होते. मात्र शिवसेनेने सुधार समितीमध्ये हे सर्व प्रस्ताव रोखून धरले. मेट्रोच्या कामात व्यत्यय येवू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारांचा वापर करीत मेट्रो प्रकल्पाआड येणारी झाडे तोडण्यास परवानगी दिली. आतापर्यंत आरे कॉलनीसह मेट्रो रेल्वेच्या मार्गात आड येणाऱ्या तब्बल चार हजार झाडांची कत्तल करण्यात आली आहे. आता आणखी ४४४ झाडे तोडण्यासाठी पालिकेने सूचना- हरकती मागविल्या आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला शिवसेनेने कडाडून विरोध केला. या झाडांची पाहणी केल्यानंतरच निर्णय घ्यावा, अशी मागणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी बैठकीत केली.

Post a Comment

 
Top