
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री थेट अहमदाबाद गाठत पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. फडणवीस यांच्यासोबत महसूलमंत्री व अमित शहांचे निकटवर्तीय चंद्रकांत पाटील हे सुद्धा भेटीदरम्यान हजर होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी ही भेट गुजरात निवडणुकीसाठीच्या प्रचार नियोजनाचा भाग असल्याचे माध्यमांना सांगितले. मात्र, या भेटीदरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा झाल्याचे कळते. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत येत्या 28 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि मुख्यमंत्री यांची पुन्हा एक बैठक होणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
अहमदाबाद जाण्यापूर्वी राणे- फडणवीस भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चंद्रकांत पाटलांसोबत रात्री 8 च्या सुमारास अहमदाबादला मुंबईहून रवाना झाले होते. मात्र, त्यापूर्वी सोमवारी सायंकाळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. यावेळी दोघांत विधान परिषदेची उमेदवारी आणि मंत्रिमंडळातील समावेश याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर फडणवीस चंद्रकांतदादांसह अहमदाबादला रवाना झाले होते. यानंतर रात्री उशिरा या दोघांनी अमित शहांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. यात महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा झाली.
9 डिसेंबरपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार शक्य?
दरम्यान, पुढील आठवड्यात मुख्यमंत्री पुन्हा एकदा अमित शहांसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत. 28 नोव्हेंबरला ही नियोजित भेट होऊ शकते. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे 9 डिसेंबरपूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता बळावली आहे. कारण 11 डिसेंबरनंतर नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी विस्तार करता आला नाही तर तो थेट नव्या वर्षात जानेवारी महिन्यात संक्रांती मुहूर्तावर होऊ शकतो. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय मार्गी लावावा असे फडणवीस यांचे म्हणणे आहे. आता याला पंतप्रधान मोदी आणि शहांच्या ग्रीन सिग्नलची प्रतिक्षा आहे.
Post a Comment