0


नवी दिल्ली - नेहमी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी पद्मावती चित्रपटाला विरोध करत बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. पद्मावती चित्रपटाच्या रिलीजवरुन सुरु असलेल्या वादावर साक्षी महाराज यांना विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, 'इतिहासासोबत कसल्याही प्रकारची छेडछाड खपवून घेतली जाणार नाही. ज्याप्रकारे पद्मावती महाराणी, हिंदू आणि शेतक-यांचा विनोद केला जात आहे, ते पाहता सरकार आणि प्रशासनाला चुकीचं होतंय याची जाणीव होणं गरजेचं आहे. त्यांनी पद्मावती चित्रपटावर पुर्णपणे बंदी आणली पाहिजे'.
जेव्हा साक्षी महाराजा यांना सांगण्यात आलं की चित्रपटसृष्टी याचा विरोध करत आहे तेव्हा ते बोलले की, 'चित्रपटसृष्टीला अस्मिता आणि देशाशी काही देणं घेणं नाही. त्यांना फक्त पैसा हवा आहे. पैशांसाठी ते नग्न होण्यासोबत काहीही करु शकतात'. 
साक्षी महाराजांआधी भाजपा खासदार  चिंतामणी मालवीय यांनीही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. चिंतामणी मालवीय यांनी चित्रपटसृष्टीतील नात्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. 'या चित्रपटाचा मी बहिष्कार करतो. फिल्मी आयुष्यात एका पत्नीला आज सोडलं, तर उद्या दुसरीसोबत...ज्यांच्या पत्नी रोज आपले पती बदलत असतात त्यांच्यासाठी एखादी कल्पना करणं कठीण नाही'. 
गुजरातमध्ये सत्तेत असणा-या भाजपाने राज्यातील विधानसभा निवडणुका होईपर्यंत चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. तर काँग्रेसने जर खरंच चित्रपटात इतिहासासोबत छेडछाड करण्यात आली असेल, तर प्रदर्शित केला जाऊ नये असं म्हटलं आहे. 
वाद वाढत असल्याचं पाहून चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांनी गुरुवारी पद्मावतीच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट लिहिली होती. यामध्ये त्यांनी वाद न वाढवण्याचं आवाहन केलं होतं. त्यांनी लिहिलं होतं की, 'नमस्कार मी संजय लिला भन्साळी आहे आणि तुमच्याशा काहीतरी बोलायचं आहे. मी हा चित्रपट अत्यंत जबाबदारी आणि मेहनतीने बनवला आहे. मी नेहमीच राणी पद्मावती यांच्यापासून प्रभावित झालो असून हा चित्रपट त्यांच्या शूरता आणि बलिदानाला नमन करतो. पण काही अफवांमुळे हा चित्रपट वादाचा मुद्दा ठरला आहे. चित्रपटात राणी पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्यात काही ड्रीम सिक्वेन्स शूट करण्यात आल्याची अफवा आहे. मी आधीच असं काही नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की, चित्रपटात भावना दुखावेल असा कोणताही सीन नाही'.

Post a Comment

 
Top