
नवी दिल्ली: भारत क्रिकेटची अक्षरश: पूजा केली जाते. इथे क्रिकेटर म्हणजे देव समजला जातो. जोपर्यंत क्रिकेटपटूचा फॉर्म आहे, तोवर त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळली जातात, मात्र फॉर्म हरवल्यानंतर ना तुम्हाला कोणी लक्षात ठेवतं, ना तुमचं कोणी कौतुक करतं.
क्रिकेट टीममध्ये स्थान मिळालं नाही तर क्रिकेटपटूंवर कोणती वेळ येऊ शकते हे सांगता येत नाही.
अंडर 19 वर्ल्डकपमध्ये 2008 साली विराट कोहलीच्या विश्वविजयी संघात खेळलेल्या एका खेळाडूवर अशीच वाईट वेळ आली आहे. विश्वविजेत्या संघातील या खेळाडूला जगण्यासाठी सध्या रस्त्यावर छोले-भटुरे विकावं लागत आहे.
पेरी गोयल असं या खेळाडूचं नाव आहे. सध्या पेरी गोयलचे छोले भटुरे विकणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
विराट कोहलीच्या टीम इंडियाने 2008 मध्ये अंडर 19 वर्ल्डकप जिंकला होता. या संघात रवींद्र जाडेजा, मनिष पांडे यासारखे खेळाडू होते. याच संघात पेरी गोयलची राखीव विकेट कीपर म्हणून निवड झाली होती. मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
खराब फॉर्ममुळे बाहेर
2008 हा असा काळ होता, ज्यावेळी महेंद्रसिंह धोनी नव्या भारतीय संघाची बांधणी करत होता. त्याच वर्षी विराटच्या टीम इंडियाने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामुळे त्या संघातून विराटसह आणखी नवे चेहरे धोनीला मिळाले.
त्यावेळी पेरी गोयलचं नावही चर्चेत होतं. मात्र वर्ल्डकपनंतर पेरी गोयलला स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याचं नाव मागे पडत गेलं. पंजाबकडून खेळणाऱ्या पेरी गोयलला मोठी खेळी करता न आल्याने तो संघातूनच बाहेर पडला.
आता छोले भटुरे विकतो
आता छोले भटुरे विकतो
विश्वचषकाने पेरी गोयलला हिरो बनवलं होतं. मात्र क्रिकेटमध्ये सातत्य राखता न आल्यामुळे त्याच्यावर आता छोले भटुरे विकण्याची वेळ आली आहे. सध्या पेरी लुधियाना महापालिकेबाहेर छोले भटुरे विकतो. त्याची ही कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मात्र त्याचं फेसबुक अकाऊंटवर पाहिलं असता, तो एका कंपनीचा संचालक असल्याचं म्हटलं आहे. मात्र त्याबाबत अद्याप पुष्टी होऊ शकलेली नाही.
Post a Comment