0


मुंबई १९९२ साली जोगेश्वरी स्थानकातील फूट ओव्हर ब्रीज कोसळून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या महिलेला १३ लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश ग्राहकमंचाने पश्चिम रेल्वेला दिले आहेत. विद्या सामंत असे त्या महिलेचे नाव असून त्यांना तब्बल २५ वर्षाच्या लढ्यानंतर न्याय मिळाला आहे.
विद्या सामंत व त्यांचे पती विलास सामंत २८ सप्टेंबर १९९२ ला जोगेश्वरीहून घाटकोपरला जाण्यासाठी निघाले होते. जोगेश्वरी स्थानकातील पुलावरून ते रेल्वेच्या दिशेने जात असताना पुलाचा काही भाग कोसळला. या अपघातात विद्या सामंत गंभीर जखमी झाल्या होत्या त्यानंतर त्यांना रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी सरकारी रूग्णालयात दाखल न करता कूपर या खासगी रूग्णालयात दाखल केले. तसेच त्यांना उपचाराचाही खर्च दिला नाही. त्यामुळे सामंत कुटूंबाचे बरेच पैसे खर्च झाले. उपचारासाठी त्यांना दोन महिने कामावरही जाता आले नाही. त्यामुळे त्यांनी रेल्वे कडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी ग्राहकमंचाने धाव घेतली होती.
सामंत दाम्पत्याने त्यांना झालेल्या त्रासासाठी चार लाख रूपये नुकसान भरपाई मिळावी म्हणून याचिका दाखल केली होती. मात्र रेल्वेने सामंत दाम्पत्य पश्चिम रेल्वेने प्रवास करत नसल्याचा दावा केला होता. सामंत यांच्याकडे रेल्वेचे तिकीट नसल्याने ते खोटं बोलत असल्याचा दावा पश्चिम रेल्वेने केला होता. मात्र तरीही सामंत यांनी माघार न घेता २५ वर्षे न्यायालयात लढा दिला. अखेर गुरुवारी ग्राहकमंचाने सामंत दाम्पत्याच्या बाजूने निकाल देत त्यांना ४.९५ लाख रूपये मुद्दल व ९% टक्के वार्षिक व्याजानुसार एकूण १२.९६ लाख रूपये देण्याचे आदेश दिले आहेत.

Post a Comment

 
Top