0
आर. आर. आबांची कन्या स्मिता होणार दौंडची सूनबाई, येत्या मे महिन्यात विवाह

पुणे- राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे दिवगंत नेते आर आर (आबा) पाटील यांची राजकीय वारसदार असलेली त्यांची कन्या स्मिता पाटील या दौंड तालुक्याच्या सूनबाई होणार आहेत. पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार रमेश थोरात यांचे पुतणे आनंद थोरात यांच्याशी स्मिता यांचा विवाह होणार आहे. मे-2018 मध्ये हे जोडपे विवाहबद्ध होणार असून, हे लग्न जमविण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच पुढाकार घेतला असल्याच्या वृत्ताला रमेश थोरात यांनी दुजोरा दिला आहे.
रमेश थोरात यांचे थोरले बंधू प्रभाकर थोरात यांचा मुलगा आनंद आणि आर आर आबांची कन्या स्मिता यांचे लग्न ठरले आहे. शरद पवारांच्या पुढाकारानेच हे लग्न जमले आहे. आनंदने परदेशात शिक्षण घेतले असून, सध्या तो पुण्यात बिझनेस करतो. तर स्मिता यांच्याकडे राष्ट्रवादी युवती काँग्रेसची जबाबदारी आहे.
आर आर आबा हे शरद पवारांचे सर्वाधिक विश्वासू सहकारी होते. आबांच्या निधनाने पवारांना अतिव दु: ख झाले होते. आर आर आबा सामान्य घरातून पुढे आले होते. आजही त्यांचे सर्व कुटुंबिय सामान्य व साधे राहतात, वागतात. आबांचे घराणे तालेवार नव्हते. त्यामुळे आबांच्या निधनानंतर पवारांनी त्यांच्या कुटुंबांकडे वैयक्तिक लक्ष घालणार असल्याचे म्हटले होते. आबांना दोन मुली व मुलगा रोहित आहे. मात्र, हे सर्व जण अद्याप महाविद्यालयीन व शालेय शिक्षण घेत होते. त्यामुळे आबांच्या माघारी शरद पवारांनी स्मिताच्या लग्नात लक्ष घातले.
दौंड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते व माजी आमदार रमेश थोरात यांच्याशी पवारांचा राजकारणाशिवाय स्नेह आहे. त्यामुळे थोरातांच्या पुतण्याला स्मिताचे स्थळ पवारांनी सूचवले. थोरात कुटुंबियांकडून पसंती झाल्यानंतर हे लग्न जमल्याची माहिती मिळाली. येत्या मे महिन्यात स्मिता व आनंद यांच्या लग्नाचा बार पुण्यात उडणार असल्याचे कळते.

Post a Comment

 
Top