
कोल्हापूर-सासरा आणि दिरासह जाऊ आणि तिच्या आई-वडिलांकडून शारीरिक, मानसिक त्रास, मारहाण केला जात असल्याने आणि पोलिसांना वारंवार तक्रार देऊनही कारवाई केली जात नसल्याने कंटाळून अखेर शफीका समीर शिकलगार (रा.इचलकरंजी) या विवाहितेने पती आणि दोन मुलांसह कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
पोलिसांनी हस्तक्षेप करत शफीका हिच्या हातातून रॉकेलचा डबा हिसकावून घेऊन तिला ताब्यात घेतले. या महिलेने पोलिस अधीक्षक कार्यालयात घातलेल्या गोंधळामुळे कार्यालयीन कामकाजात व्यस्त असलेले पोलिस अधिकारी सुद्धा गडबडून गेले.
पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा आणि इचलकरंजीचे अप्पर पोलिस अधीक्षक दिनेश बारी यांनी त्या महिलेचे गाऱ्हाणे ऐकून घेऊन तिला त्रास देणाऱ्या कुटुंबातील सदस्यांवर कारवाई करण्याची ग्वाही दिली. आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून या महिलेसह तिच्या पतीवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment