0


मुंबईः-निवडणुका कधीही होऊ शकतात, शिवसैनिकांनो तयार राहा ! असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला आहे. 
आज (दि.१ नोव्हेंबर) सांयकाळी साडेसातच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी ट्विटर खात्यावरून ही अशी पोस्ट केली आहे. यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, हे उद्धव ठाकरेंचे अधिकृत खाते नाही पण त्याला आदित्य ठाकरे फॉलो करतात.
नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशावरून सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये वितुष्ट वाढले आहे. नारायण राणेंना मंत्रिमंडळात प्रवेश दिल्यास सरकारचा पाठिंबा काढू, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. तर राणेंच्या बाबतीत आपण ठाम असल्याचे मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्याने हा वाद आणखीनच वाढला आहे. 
नारायण राणे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा, अशी सूचना भाजपकडून राणे यांना केली गेली होती. या पक्षाने ‘रालोआ’ला पाठिंबा द्यावा, म्हणजे शिवसेनेला विरोध करता येणार नाही, असे त्यामागचे गणित होते. राणे यांना भाजपच्याच कोट्यातून मंत्रिपद दिले जाणार असल्याने शिवसेनेला विरोध करता येणार नाही, असे स्वतः मुख्यमंत्र्यांनी दै. ‘पुढारी’ला दिलेल्या मुलाखतीतच सुनावले होते.
शिवसेनेचा विरोध कितीही तीव्र असला, तरी नारायण राणे यांना आगामी विस्तारात मंत्रिमंडळात घेतले जाईल, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.   
या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना आणि भाजपमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या ताज्या पोस्टवरून शिवसेना सरकारचा पाठिंबा काढण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.   

Post a Comment

 
Top