
बीड-गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील इंदिरानगर भागात बिनबोभाटपणे चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा रविवारी रात्री पोलिसांनी भंडाफोड केला. या कुंटणखान्यावर धाड टाकून चार ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले, तर तीन महिलांची सुटका करण्यात आली. दरम्यान, कुंटणखानाचालक महिला फरार असून एकूण पाच जणांविरोधात शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शहरातील इंदिरानगर भागात गेल्या काही दिवसांपासून वेश्याव्यवसाय सुरू होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक महिला शहरासह परजिल्ह्यातून महिला आणून कुंटणखाना चालवत होती. पोलिस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांना खबऱ्यामार्फत याबाबत माहिती मिळताच रविवारी शिवाजीनगर पोलिस, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने या कुंटणखान्यावर रात्री छापा मारला. या वेळी सय्यद आमेर सय्यद अमीन (२१, रा. बीड), दादासाहेब जालिंदर मस्के (३१, रा. गवळवाडी), मुजम्मील सत्तार शेख (२२, रा. बीड), श्रीहरी लहू दाईगडे (२६, रा. चाकरवाडी) या चार ग्राहकांना अटक करण्यात आली. तीन महिलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर करून सुधारगृहात त्यांची रवानगी करण्यात येणार आहे. पोलिस उपनिरीक्षक दीपाली गिते यांच्या तक्रारीवरून चार ग्राहकांसह आंटी मदिनाबी शेख अशा पाच जणांवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ हे करत आहेत.
Post a Comment