0
जालन्यात 2 स्टील कंपन्यांकडे सापडले 60 कोटींचे काळे धन; प्राप्तिकर खात्याची कारवाई

औरंगाबाद-नोटाबंदीनंतर मराठवाड्यात सर्वात मोठे काळे धन एकाच दिवशी एकाच शहरातून शोधून काढण्यात प्राप्तिकर खात्याला यश आले आहे. औरंगाबाद, नाशिकच्या प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी जालन्यातील दोन बड्या स्टील कंपन्यांवर मागील आठवड्यात धाड टाकली. चार दिवसांच्या धडक कारवाईनंतर या कंपन्यांकडे कर चुकवून जमा केलेले ६० कोटी रुपयांचे काळा पैसा सापडल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी जाहीर होताच सरकारने त्या कालावधीत झालेल्या अनेक व्यवहारांची चौकशी सुरू केली. मराठवाड्यातून प्रचंड डेटा प्राप्तिकर विभागाकडे येत होता. सुरुवातीपासून जालना शहर रडारवर होते. प्राप्तिकर विभागाने सर्व संशयास्पद बँक व्यवहार तपासून दिवाळी संपताच ३१ ऑक्टोबरपासून कारवाई सुरू केली. यानंतर दोन स्टील कंपन्यांवर धाडी घालण्यात आल्या. औरंगाबाद प्राप्तिकर विभागाच्या इन्व्हेस्टिगेशन विभागाचे प्रमुख व उपसंचालक अभिजित चौधरी आणि नाशिक येथील याच विभागाचे सहसंचालक अमितकुमार यांनी १ नोव्हेंबर ते ४ नोव्हेबर या ४ दिवसांत ही मोहीम फत्ते केली.
१. २०० जणांची टीम, नाशकात धाडीची अफवा पसरवली : या कारवाईची कुणालाही कुणकुण लागू नये म्हणून जालन्याऐवजी औरंगाबाद पोलिसांची मदत घेण्यात आली. तब्बल दोनशे लाेकांची टीम तयार करण्यात आली. विशेष म्हणजे नाशिकला धाडी घातल्या जात आहेत, अशी अफवा पसरवून टीम तिकडे रवानाही केली. नाशिकला एक दिवस मुक्काम करून २०० जणांची टीम १ नाेव्हेंबरला सकाळी १० वाजता जालन्यात धडकली. एका टीमने एमआयडीसीतील दोन्ही कंपन्यांत जाऊन त्याचा ताबा घेतला. दुसरी टीम दोन्ही उद्योजकांच्या घरी गेली. ती सर्व घरे सील करून तेथे पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला.

२. एकाच वेळी सर्व नातेवाईकांच्या शहरात धाडी
ही धाड जालन्यात सुरू असली तरी एकाच वेळी देशभरातील प्राप्तिकर विभागाला हाय अलर्ट देण्यात आला होता. दोन्ही उद्योजकांच्या मुंबई, पुणे, इंदुर, कोलकात्यातील नातेवाइकांच्याही घरी धाडी घालून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत रोज कारवाई सुरू होती.

३. दहा एकर जागेत कारवाई
एका उद्योजकाचे घर तब्बल दहा एकर जागेत होते. या अवाढव्य जागेमुळे तेथे कारवाईत अनेक अडचणी अधिकाऱ्याना आल्या. आता ही कारवाई संपली असून टीम जालन्याहून औरंगाबादला आली आहे.
रोख अडीच कोटी सापडले
या धाडींत अडीच कोटी रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यांची छाननी करून संशयास्पद व्यवहारांचा माग काढला जात आहे. जमीन, सोने आणि कंपनीतील मालाचा स्टॉक ते व्यवहार किती पारदर्शक आहेत, याची तपासणी झाली. प्राथमिक तपासात दोन्ही कंपनी मालकांनी कर चुकवून ६० कोटी रुपयांचा काळा पैसा जमवल्याचे समोर आले.
करचुकवेगिरी उघड
प्राप्तिकर कायद्याच्या कलम १३२ (करचुकवेगिरी) अन्वये ही कारवाई झाली. गोपनीयतेमुळे कंपन्या व उद्योजकांची नावे जाहीर करता येत नाही. आरोपींवर दंडात्मक कारवाई केली जाईल. 
- शिवदयाळ श्रीवास्तव, प्रधान आयुक्त, औरंगाबाद प्राप्तिकर विभाग


Post a Comment

 
Top