0
17 वर्षांच्या मुलीने पतीवर केला बलात्काराचा आरोप; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर बहुधा पहिला गुन्हा

वृंदावन​-उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध वृंदावन शहरातील एका १७ वर्षाच्या विवाहितेने कथावाचक पतीवर बलात्कार केल्याचा व वेश्या व्यवसायास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी कथावाचक मोहन भारद्वाज याच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून आरोपी फरार आहे. १८ वर्षाहून कमी वय असलेल्या पत्नीशी शारिरिक संबंध ठेवले तर तो बलात्कार ठरेल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. या निर्णयानंतर अशा प्रकारचा गुन्हा दाखल होण्याची बहुधा पहिलीच घटना असावी.

विवाहिता वृंदावन येथे आईसाेबत राहते. तिने पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, परिक्रमा चालू असताना तिच्या आईची व मोहनची दोन वर्षापूर्वी ओळख झाली. विवाहितेच्या घरी सर्वजण कृष्णभक्त असल्याने मोहनचे तिच्या घरी येणे-जाणे सुरू झाले. एकदा पीडिता घरी एकटीच असल्याचे पाहून मोहनने तिच्यावर बलात्कार केला. पाेलिस ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी मोहनने तिला दिली होती. यानंतर त्याने अनेकदा तिच्यावर जबरदस्ती केली. पीडितेने त्याला धमकावल्यानंतर तो लग्नास तयार झाला. लग्न झाल्यानंतर मोहनने तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले.

Post a Comment

 
Top