0
दिंडोरीत अल्पोपहारातून 150 हून अधिक शेतकऱ्यांना विषबाधा; एकाचा मृत्यू
नाशिक (दिंडोरी)- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याच्या उमराळे बुद्रुक येथे धात्रक वस्तीवर एका बियाणे कंपनीने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या चर्चासत्रात जेवणातून सुमारे १५० हून अधिक शेतकऱ्यांना विषबाधा झाली असून एका शेतकऱ्याचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली.
विषबाधा झालेल्या इतरांवर नाशिक तसेच दिंडोरी येथील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. अतुल केदार (४१) असे मृताचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, उमराळे बुद्रुक येथे पेठरोडलगत रमेश मनोहर धात्रक यांच्या वस्तीवर बायर सीड कंपनीने संकरित टोमॅटो पिक पहाणी व चर्चासत्र आयोजित केले होते.
चर्चासत्रानंतर दुपारी एकला सुमारे १५० शेतकऱ्यांनी जेवण केले. त्यानंतर काही शेतकऱ्यांना मळमळ व उलटीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना नातेवाईकांनी नाशिक येथे खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यातील अतुल केदार यांचे उपचारादरम्यान निधन झाले. दरम्यान, या घटनेने सर्वत्र घबराट पसरली.
रात्री नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात ४० तर दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात १२ शेतकऱ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याचबरोबर दिंडोरी व नाशिक येथील विविध खासगी दवाखान्यांत सुमारे ५० हून अधिक रुग्णांना दाखल करण्यात आले. या घटनेचे वृत्त समजताच आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले यांनी शासकीय यंत्रणेला सूचना दिल्या.

Post a Comment

 
Top