0
सलग तिसऱ्या दिवशी उस्मानाबादेत राज्यातील सर्वात कमी 12 अंश तापमान, नाशकात 12.2
औरंगाबाद - सलग तिसऱ्या दिवशी उस्मानाबाद येथे राज्यातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली. बुधवारी उस्मानाबादेत १२ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले, त्याच वेळी नाशिकमध्ये १२.२ अंश तापमानाची नोंद झाली.
उस्मानाबाद येथे सोमवारी १०, अंश तर मंगळवारी १२.४ अंश असे राज्यातील सर्वात कमी तापमान नोंदवण्यात आले. उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि वाढता हवेचा दाब यामुळे राज्यातील पारा घसरत असल्याचे मत हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केले. आगामी आठवडाभर थंडीचे केंद्र उस्मानाबाद राहील व राज्यात सर्वत्र हुडहुडी भरवणारी थंडी पसरेल अशी शक्यता या तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
यासंदर्भात ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ व परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संशोधन परिषदेचे सदस्य डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले, महाराष्ट्रात आता थंडीचे आगमन झाले आहे. आता राज्यावरील हवेचा दाब वाढून १०१० ते १०१४ हेप्टापास्कल इतका राहील. त्यामुळे संपूर्ण राज्यात मध्यम स्वरूपाची थंडी जाणवेल. सकाळ व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होऊन हवामान थंड व कोरडे राहील. यंदा थंड दिवसांचे प्रमाण जास्त राहील. आगामी आठवडाभर उस्मानाबाद हे कमी तापमानाचे केंद्र राहील.

विभागनिहाय अंदाज 
पश्चिम महाराष्ट्र : सोलापूर, नगर आणि पुणे जिल्ह्यांत तापमान १५ ते १६ अंश सेल्सियस राहील. सोलापूर व नगर जिल्ह्यांत सापेक्ष आर्द्रता ६२ ते ६९ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र :नाशिक जिल्ह्यात किमान तापमान १२ ते १४ अंश, धुळे,नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत किमान तापमान १६ अंश सेल्सियसपर्यंत राहील.

पश्चिम विदर्भ :अकोला जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश तर अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, वाशीम, बुलडाणा येथे १८ ते १९ अंश सेल्सियस राहील.

पूर्व विदर्भ :भंडारा, गोंदिया येथे किमान तापमान १९ अंश तर चंद्रपूर व गडचिरोली येथे २० अंश सेल्सियस राहील.

Post a Comment

 
Top