
जळगाव- भुसावळ तालुक्यातील बोहर्डी बुद्रूक येथे प्राथमिक शाळेच्या ११ विद्यार्थिनींवर अत्याचारप्रकरणी मुख्याध्यापकास सोमवारी फैजपूरमध्ये अटक करण्यात आली. दुसरीकडे भुसावळच्या बीडीओंनी पीडित विद्यार्थिनींच्या पालकांची भेट, तर विस्तार अधिकाऱ्यांनी दिवसभर जाबजबाब घेतले. या सर्व घडामोडींमुळे एकही विद्यार्थी शाळेकडे फिरकला नाही.
बोहर्डी येथील प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक गणेश चुडामण कोलते (वय ४८,वरणगाव) याने इयत्ता तिसरीच्या ११ विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला होता. शनिवारी या प्रकरणी वरणगाव पोलिसात हा गुन्हा दाखल झाला. मात्र, यानंतर मुख्याध्यापक कोलते पसार झाला होता. तीन पोलिस पथके त्याच्या मागावर होती. सोमवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास त्याला फैजपूर येथील आसारामनगरातून अटक करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक जगदीश परदेशी, रहिवरअली सय्यद, रवींद्र बोंडे आदींनी ही कारवाई केली. यानंतर त्याला भुसावळातील विशेष न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
शाळेत सर्वच मुले गैरहजर
सोमवारीएकाही पालकाने आपल्या मुलांना शाळेत पाठवले नाही. तसेच सोमवारीच बीडीओंनी बोहर्डी गाठून पालकांशी संवाद साधला. शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिमा सानप, रागिनी चव्हाण, केंद्रप्रमुख नलिनी झांबरे यांनी बोहर्डीत जाऊन याप्रकरणी संबंधित ११ पीडित मुलींचे पालक शालेय पोषण आहार मदतनिसांचे जबाब नोंदवले. हा अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात येईल. तसेच घटनेच्या पार्श्वभूमीवर शालेय व्यवस्थापन समितीची बैठकदेखील घेण्यात आली.
दरम्यान, मुख्याध्यापक काेलते यांच्यासंदर्भातील अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला अाहे. त्यावरून मंगळवारी काेलते यांना निलंबित करण्यात येणार अाहे.
११ मुलींची झाली वैद्यकीय तपासणी
पीडित११ अल्पवयीन मुलींची जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी करण्यात आली. पीडित मुलींच्या वैद्यकीय तपासणीवेळी पालक डॉक्टरांमध्ये जिल्हा रुग्णालयात वाद झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी मंगला पाटील यांनी पीडित मुलींच्या पालकांची बाजू लावून धरली होती. तांत्रिक कारणामुळे डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी करण्यास असमर्थता दाखवल्यामुळे वाद चिघळला होता. या वेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.किरण पाटील यांनी पालकांची समजूत काढली. तणाव निवळल्यानंतर मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
Post a Comment