0
1 कोटी 98 लाख रक्कम बघून फिरले भावाचे डोळे; समृद्धी मार्गाच्या मोबदल्यावरून घराघरांत वाद
औरंगाबाद-समृद्धी महामार्गासाठी सध्या शेतजमिनीचे भूसंपादन जोरात सुरू आहे. बागायती शेतीसाठी मोठा मोबदलाही मिळत आहे. मात्र त्यामुळे घरामधील अनेक वाद समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

माळीवाडा येथील एक शेतकरी गेल्या आठवड्यात रजिस्ट्रीसाठी आल्यानंतर जमिनीची मिळालेली कोटी ९८ लाख रुपये मोबदल्याची रक्कम पाहिल्यानंतर भावाने सहहिस्सेदार असतानाही सही देण्यास नकार दिला. यामध्ये माझीही जमीन जाणार असल्याचे सांगत त्यांनी रजिस्ट्री कार्यालयातून काढता पाय घेतला. त्यामुळे अधिकाऱ्यासमोरदेखील प्रश्न निर्माण झाले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात माळीवाडामध्ये शेतकऱ्यांनी समृद्धीविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. माळीवाडामध्ये बागायती जमीन असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगली रक्कम मिळत आहे. गेल्या आठवड्यात एक शेतकरी त्याची ६० गुंठे जमीन समृद्धीसाठी देण्यासाठी राजी झाला होता. ६० गुंठे जमिनीसाठी त्याला एक कोटी ९८ लाख रुपयांचा मोबदला मिळणार होता. मात्र त्यावर त्याच्या भावाची जो सहहिस्सेदार आहे त्याची सही आवश्यक होती. यामध्ये सहहिस्सेधारक असलेल्या भावाची जमीन समृद्धीमध्ये जाणार नाही.

या भूसंपादनासाठी केवळ ना हरकतीसाठी त्याची सही आवश्यक होती. मात्र भावाला मिळणारा कोटी ९८ लाख रुपयांचा आकडा पाहिल्यानंतर त्यांनी लगेच माझीही जमीन जातेय, असा विरोधी सूर लावत रजिस्ट्री कार्यालयातून काढता पाय घेतला. त्यामुळे अधिकाऱ्यांसमोर नवीच डोकेदुखी उभी राहिली आहे.

बहिणीही मागत आहेत हिस्सा
समृद्धी महामार्गात मोठ्या प्रमाणात भाव मिळत असल्यामुळे ज्याच्या जमिनीची वाटणी झाली नाही आणि बहिणीचेही नाव सातबारावर आहे अशा घरात वाद होत आहेत. बहिणीकडून आम्हालाही वाटा मिळावा यासाठी पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे अनेक घरांत वाद होत असल्याचे चित्र आहे.

Post a Comment

 
Top