
नांदेड-नांदेड- वाघाळा महापालिकेच्या ८१ जागांसाठी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. बुधवारी झालेल्या निवडणुकीत सुमारे ६१% मतदान झाले. या निवडणुकीसाठी ५७८ उमेदवार रिंगणात आहेत. ५५० मतदान केंद्रांवर राखीव कर्मचाऱ्यांसह एकूण तीन हजार ३६१ जणांची नियुक्ती करण्यात आली होती. यासोबतच १८९ वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान केंद्रांसाठी एकूण दोन हजार ५०० बॅलेट युनिट ८०० कंट्रोल युनिटचा वापर करण्यात आला. विविध राजकीय पक्षांचे ४२३ अपक्ष १५५ अशा एकूण ५७८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.
अशोक चव्हाण गड राखणार का?-काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची या निकालाच्या निमित्ताने प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मोदी लाटेतही खासदार म्हणून निवडून आलेल्या अशोक चव्हाण यांची आज पुन्हा एकदा नांदेड महापालिकेच्या निकालाच्या निमित्ताने ताकद समोर येणार आहे. भाजपने नांदेड महापालिकेसाठी काँग्रेस, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे लोक आपल्या पक्षात घेत बेरजेचे राजकारण केले आहे. त्याला नांदेडकर कसा प्रतिसाद देतात यावर निकालाचे भवितव्य अंवलबून राहील. एमआयएमने गेल्या निवडणुकीत तब्बल 12 टक्के मते घेतली होती. यंदा त्यांना किती आणि कसा प्रतिसाद मिळतो यावरही अशोक चव्हाणांच्या विजयाचे गणित ठरणार आहे. मात्र, शिवसेना-भाजप-राष्ट्रवादीच्या विभागणीचा अशोक चव्हाण यांना फायदा होऊन सत्ता त्यांच्याच हातात राहील असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे.
Post a Comment