0
शांततेचा अतिरेक झाला तर असंतोषाचा स्फोट होईल, फटाकेविक्रीबंदीवर उद्धव ठाकरेंची टीका

 मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील निवासी भागांमध्ये फटाके विक्रीवर घातलेल्या बंदीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत शांततेचा अतिरेक झाला तर एक दिवस असंतोषाचा स्फोट होईल. आता पंचांग फाडून टाका, सण वगैरे थोतांड बंद करा, असे आदेश निघायचेच बाकी आहेत. हवे तर तेदेखील काढा. अशीही आपल्याकडच्या सणांची रया गेली आहेच, असेही त्यांनी म्हटले. दुसरीकडे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही घूमजाव करत फटाकेबंदीला विरोधच असेल, असे स्पष्ट केले आहे.

“मेट्रो-३’ च्या कामाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी फटाकेबंदीवर चांगलीच टीका केली. पंचांगच फाडून टाकले तर सण-वार हे विषय येणारच नाहीत आणि फटाके फोडण्याचा प्रश्नही उद्भवणार नाही, असे सांगत मराठी माणसाच्या सणांवर गदा आलेली शिवसेना अजिबात खपवून घेणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

फटाकेबंदीवरून मंगळवारी शिवसेना नेत्यांमध्येच मतभेद पाहायला मिळाले होते. रामदास कदम यांच्या फटाकेबंदीच्या सूतोवाचानंतर संजय राऊत यांनी फटाकेबंदी होऊ देणार नाही, असे म्हटले होते. उद्धव ठाकरे यांनीच फटाकेबंदीला विरोध असल्याचे स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनाही आपल्या वक्तव्यापासून घूमजाव करावे लागले. मात्र, संजय राऊत यांना सुनावण्यास ते विसरले नाहीत. बुधवारी पत्रकारांशी बोलताना रामदास कदम यांनी सांगितले, संजय राऊत आणि राज ठाकरे यांना चिंता करण्याची गरज नाही. हिंदूंच्या सणाची काळजी मला आहे.
बाळासाहेबांनी हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत. हिंदूंच्या सणावर निर्बंध येणार नाही आणि हे पाप शिवसेना आणि मी करणार नाही. त्यामुळे फटाकेबंदीबाबत असा निर्णय घेणार नाही, लोकांमध्ये संभ्रम पसरवू नये, महाराष्ट्रात फटाकेबंदी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

 
Top