0
आत्महत्येस गेलेल्या महिलेचा वाचवला जीव; मैत्री स्कूटर महिला फोर्स मिसरोद ठाण्यात दाखल

भाेपाळ -एका तरुणीने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे आत्महत्या करण्यास निघालेल्या एका महिलेचा जीव वाचला. फोनवरून दिराशी वाद झाल्याने एक महिला रागाच्या भरात अहमदपूर रेल्वे फाटकाजवळ आत्महत्या करण्यास गेली होती. योगायोगाने सुप्रिया बराल या तरुणीचे लक्ष तिच्याकडे गेले. या घटनेची माहिती देताना सुप्रिया म्हणाली, अहमदपूर रेल्वे फाटकाजवळ शनिवारी सकाळी एक महिला रेल्वे रुळावर आत्महत्या करण्याच्या उद्देशाने बसून होती. मी कार्यालयाकडे जात असताना माझे लक्ष तिच्याकडे गेेले. ती रेल्वे येत असताना तिच्यासमोर धावत निघाली होती. ते पाहून मी तिच्यामागे धावले. तिला पकडले असता ती रुळावर आडवी पडण्याचा प्रयत्न करू लागली. मी तिला रुळावरून कसेबसे ओढून बाजूला नेले. तिची विचारपूस करू लागले. त्यानंतर वी केअर फॉर यू हेल्पलाइनला फोन लावला. तिने रडतच सांगितले, वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झाले. लग्नाला १४ वर्षे झाली. तीन मुले आहेत. सकाळी दिरासोबत फोनवरून काही वाद झाले. त्यामुळे मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

सुप्रिया म्हणाली, त्यानंतर तिच्या दिराचा क्रमांक घेतला आणि त्याला कॉल केला. तो काही धड बोलला नाही. मग महिलेच्या पतीला फोन केला. तो आणि पोलिस घटनास्थळी येईपर्यंत ३० ते ३५ मिनिटे मी महिलेसोबत थांबले होते. त्यानंतर पोलिस आले.
दिराशी फोनवरून बोलताना थांबवले म्हणून राग
पोलिसांनी दिराला फोन केला. त्यानंतर सुप्रियाने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्याने टाळाटाळ केल्याचे लक्षात आले. तेव्हा महिलेच्या पतीला फोन लावला. ते ताबडतोब रेल्वे फाटकाजवळ आले. त्यांनी पोलिसांना सांगितले, माझ्या बायकोला एवढ्याशा कारणावरूनही राग येतो. सकाळी लहान भावाच्या मोबाइलवरून कोणाशी तरी बोलत होती. त्याला कामावर जायचे असल्याने तिच्या हातातून त्याने फोन घेतला. तेव्हा ती रागारागात पायी चालत रेल्वे फाटकापर्यंत आली. पोलिसांनी समज देऊन दोघांनाही घरी पाठवले.

Post a Comment

 
Top